कला अकादमीच्या इमारतीचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू असून, सद्य:स्थितीत केवळ मुख्य थिएटरचे काम तेवढे शिल्लक आहे. उर्वरित सर्व काम पूर्ण झालेले असून, थिएटरचे काम पूर्ण झाले की कला अकादमी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आपणावर नाहक आरोप करू नयेत, असे कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काल सांगितले.
कला अकादमीच्या दुरुस्तीचे काम हे सार्वजनिक बांधकाम खाते करीत आहे. त्यामुळे या कामासंबंधीच्या ज्या तक्रारी किंवा प्रश्न आहेत, ते विरोधकांनी खरे म्हणजे त्या खात्याला विचारायला हवेत; पण विरोधकांना या प्रश्नावरून विनाकारण आपणाला लक्ष्य करायचे आहे, असे गावडे यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले. दरम्यान, मंगळवारीच काँग्रेसने कला अकादमी जनतेसाठी खुली होईल, हे सरकारने जाहीर करावे, मागणी केली
होती.