कलाकारांचा एल्गार

0
10

गोवा कला अकादमीचे नष्टचर्य संपता संपत नाही. त्यामुळे संतप्त कलाकारांनी आपल्या रोषाला नुकत्याच झालेल्या महाचर्चेत वाट मोकळी करून दिली. ही सारी मंडळी प्रत्यक्ष कलाक्षेत्राशी निगडित आहेत आणि त्यामुळेच कला अकादमीशीही त्यांचे भावबंध जोडलेले आहेत. गेली काही वर्षे ह्या कला अकादमीचा जो काही खेळखंडोबा झालेला आहे, तो पाहून त्यांना वेदना होत असतील तर ते अगदी स्वाभाविक आहे. कलाकारांच्या या संतापाचा रोख राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर वळला आहे आणि त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. कदाचित ह्यापैकी काही मंडळींची मंत्र्यांबाबत वैयक्तिक खुन्नस असू शकते, परंतु राज्यातील कलाकारांची आणि आम जनतेची भावनाही कला अकादमीबाबत त्यापेक्षा वेगळी नाही. तिची जी काही दुरवस्था आज दिसते आहे, ती प्रत्येक गोमंतकीय कलारसिकाच्या काळजात कळ उठवून जाते आहे. त्यामुळे नुकतीच झालेली महाचर्चा ही केवळ प्रातिनिधिक म्हणावी लागेल. हा एका परीने गोमंतकीय कलाप्रेमी जनतेचाच उद्गार आहे. विशेष म्हणजे ह्या महाचर्चेस मंत्री गावडे स्वतः उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्यासमोरच आपल्या हाताखालील संस्थेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना निमूटपणे पाहिली. गावडे यांनी दाखवलेल्या ह्या संवेदनशीलतेचे स्वागत करायला हवे, परंतु जर ते स्वतःला एक कलाकार म्हणवत असतील, तर त्यांना समोर जो काही पाढा वाचला जात होता, त्याचा एक कलाकार ह्या नात्याने आत्यंतिक खेदही वाटायला हवा. शिवाय ह्या सगळ्याची नैतिक जबाबदारी आपली आहे, ह्याची जाणीव आणि त्यामुळे अपराधीपणाची भावनाही त्यांच्यापाशी हवी. परंतु ती काही त्यांच्यापाशी दिसत नाही. कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे हे खरे असले तरी केवळ साबांखाकडे बोटे दाखवून मंत्र्यांना हात वर करता येणार नाहीत, कारण कला अकादमीच्या वास्तूचे गोमंतकीय कलाकारांच्याच नव्हे, तर एकूण जनमानसातील अत्यंत जिव्हाळ्याचे स्थान लक्षात घेता, तिच्या नूतनीकरणाचे काम हे अतिशय जबाबदारीचे आहे हे त्यांना ठाऊक असायला हवे होते आणि त्यात त्रुटी राहिलेल्या असतील तर कलाकारांच्या सुरांत सूर मिसळून त्या दूर करणे ही त्यांची जबाबदारी होती. कोट्यवधी रुपये खर्चून झालेल्या नूतनीकरणानंतरही जर कला अकादमीची शान असलेल्या दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात गळती लागत असेल, ध्वनियंत्रणा, प्रकाशयोजना यांत दोष दिसत असतील, तर झालेल्या चुकांची सारवासारव करण्याच्या फंदात न पडता त्या मुकाट्याने मान्य करून, त्यांच्या निराकरणासाठी पावले उचलणे, त्यासाठी टीका करणाऱ्या कलाकारांना सोबत घेऊन दोष सुधारण्याबाबत चर्चा करणे जरूरी आहे. प्रेक्षागारात पाणी गळले, त्यामागे कधी छतावर पाने साचल्याचे, तर कधी वातानुकूलन यंत्रणेतून गळती झाल्याचे बाष्कळ कारण देऊन साबांखाचे वरिष्ठ अधिकारी आपली जबाबदारी झिडकारत आहेत. कला व संस्कृती मंत्रीही झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, मग ह्या सगळ्या सावळ्यागोंधळाला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेला पडला आहे. नूतनीकरणाच्या उद्घाटनाआधी खुल्या नाट्यगृहाचे छत कोसळले, त्याचा दोषी कोण? मुख्य सभागृहातील पाणी गळतीचा दोषी कोण? सदोष ध्वनिप्रकाश यंत्रणांचा दोषी कोण? कार्पेटपासून पडद्यापर्यंत ज्या निकृष्टतेच्या तक्रारी येत आहेत, त्यांचा दोषी कोण? ज्या विविध घटकांवर ह्या कामाची जबाबदारी होती, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला हवी ना? ह्या सगळ्याच गोष्टींचे खापर एकट्या कला व संस्कृती मंत्र्यांवर फोडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने प्रश्न सुटणारा नाही. उद्या ज्या कोणाच्या हाती ही कला अकादमी येईल, त्याच्याकडून तिचा कारभार सुरळीत चालवला जाईल ह्याची हमी काय? मुळात कला अकादमी ही निव्वळ वास्तू नव्हे. तो गोमंतकीय कलाकारांचा मानबिंदू आहे ही जाणीव संबंधितांपाशी हवी. राज्यातील तमाम कलाकारांसाठी गोवा कला अकादमी ही संस्था हे एक ऊर्जाकेंद्र असायला हवे. परंतु ते आजवर नेहमीच एखाद्या संस्थानासारखे चालवले जात आले आहे. तिचे अध्यक्षपद ज्यांच्याकडे येते, ते एखाद्या बादशहासारखे ह्या संस्थानचा कारभार चालवतात. तिथले संचालक मंडळ हा तर होयबांचा दरबार असतो. जेथे प्रतिभावंत कलाकारांना, साहित्यिकांना मानाचे स्थान असायला हवे, तेथे मंत्र्यासंत्र्यांच्या बगलबच्चांची आणि सत्ताधारी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच भरती झाल्यावर दुसरे काय होणार? ना कोणते कल्पक उपक्रम, ना काही नावीन्य, ना द्रष्टेपणा. कला अकादमी ही गोव्याची शान आहे. तिची प्रतिष्ठा जपली जायलाच हवी!