>> भारतात बाधितांची संख्या १२७०
>> ओमिक्रॉनमुळे दुसरा मृत्यू
देशभरात सध्या २३ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. सध्या असलेल्या सक्रिय ओमिक्रॉनबाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यांची संख्या ४५० एवढी आहे. त्याखालोखाल दिल्लीत ३२०, केरळमध्ये १०९ तर गुजरातमध्ये ९७ बाधित आहेत. दरम्यान, भारतात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ७६४ नव्या कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या १२७० झाली आहे.
देशभरात २२० मृत्यू
केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत २२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. व्यापक लसीकरणामुळे कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याचे स्वरूप गंभीर आजारात रुपांतरीत होण्याचे प्रमाण घटत आहे. मात्र तरीही वेगाने वाढणारे बाधित आणि ओमिक्रॉनचा प्रसार चिंताजनक आहे.
गुरुवारी दिवसभरात देशात ७ हजार ५८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे भारताचा रिकव्हरी रेट हा ९८.३६ टक्के इतका आहे. तर सध्या देशात ९१ हजार ३६१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
ओमिक्रॉनमुळे देशात दुसरा मृत्यू
राजस्थानमधील उदयपूरमध्ये ओमिक्रॉनमुळे एका ७३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. देशातील ओमिक्रॉनमुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीचा पहिला मृत्यू महाराष्ट्रात झाला होता. सदर वृद्धाचा मृत्यू पोस्ट-कोविड न्यूमोनियामुळे झाला आहे. २१ आणि २२ डिसेंबर रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र २५ डिसेंबर रोजी त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबासह हायपोथायरॉईडीझमचा त्रास होता. दरम्यान, राजस्थानमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे ६९ रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनबाधितांच्या यादीत राजस्थान देशात पाचव्या क्रमांकावर आहे.