राज्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेली नवीन सात ठिकाणे अधिसूचित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या एका खासगी ठरावाला उत्तर देताना काल विधानसभेत दिली. राज्यात ऐतिहासिक, पुरातत्त्व महत्त्व असलेली 51 ठिकाणे अधिसूचित करण्यात आलेली आहेत. त्यातील 18 वास्तू सरकारी जागेत, तर 33 वास्तू खासगी जमिनीमध्ये आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्राधान्य दिले जात आहे. तसेच, राज्यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सुमारे 430 वास्तू आहेत. त्यात पुरातन घरे, ऐतिहासिक स्मारकांचा समावेश आहे. राज्य पुरातत्त्व खात्याने सात वास्तूंबाबत अधिसूचना जारी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात बेतुल किल्ला, नाणूस किल्ला व इतर वास्तूंचा समावेश आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले. राज्यातील सरकारी आणि खासगी जागेत असलेल्या ऐतिहासिक, पुरातन स्थळांचे संवर्धन करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे, असेही फळदेसाई यांनी स्पष्ट केले.