ऐतिहासिक!

0
17

विशेष संपादकीय

यह इस्रोवाले भी कमाल है ।
तमन्ना चाँद की है
और उतर दिल में गए ॥

अखेर भारताचे महास्वप्न साकारले. एक भव्यदिव्य स्वप्न. भारतीय अवकाश संशोधन मोहिमांचे प्रणेते डॉ. विक्रम साराभाई, प्रोफेसर सतीश धवन, डॉ. ब्रह्मप्रकाश, भारताच्या आकांक्षांना अग्निपंख देणारे डॉ. अब्दुल कलाम ह्या आणि अशा हजारो शास्त्रज्ञांनी आजवर हे स्वप्न पाहिले. बालपणी आजीच्या कुशीत ऐकलेल्या चंदामामाच्या गोष्टीमागचे वास्तव शोधण्याचे स्वप्न. हा चंदामामा प्रत्यक्षात आहे कसा ते जवळ जाऊन बघण्याचे, दूर आकाशातून खुणावणाऱ्या त्या हरणाच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न. काल संध्याकाळी ते अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न साकारणारा मंगलक्षण आला. खरे तर अमेरिका आणि रशियाने कित्येक दशकांपूर्वी चांद्रमोहिमांमध्ये चढाओढीने यश मिळवले होते. आपल्याला तिथवर पोहोचायला मात्र 2008 साल उजाडावे लागले. चंद्रयान – 1 च्या माध्यमातून भारताचा तिरंगा चंद्रापर्यंत पहिल्यांदा पोहोचला. दुसऱ्या प्रयत्नात आपण यशस्वी झालो नाही, परंतु तरीही नाउमेद न होता चंद्रयान – 2 च्या त्या दुर्घटनेमागच्या सर्व कारणांचा शोध घेऊन नव्या ऊर्जेने चंद्रयान – 3 गेल्या महिन्यात चंदामामाच्या दिशेने निघाले तेव्हाही सर्वांच्या मनात साशंकता जरूर होती, परंतु अगदी पाठ्यपुस्तकाबरहुकूम एकेक कठीण, गुंतागुंतीचे टप्पे पार करीत चंद्रावर अवरोहणाच्या तयारीला लागले आणि काल संध्याकाळी ते अलगद चंद्रावर उतरले. हे सगळे यश गाठण्यासाठी आपल्याला आजवर किती प्रयास करावे लागले हे या आनंदाच्या प्रसंगी विसरून खचितच चालणार नाही.
1962 साली थुंबाच्या मेरी मॅग्देलीन चर्चपासून सुरू झालेला हा प्रवास. हवामानाचे अंदाज वर्तवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साध्या साऊंडिंग रॉकेटस्‌‍पासून सुरू झालेला. केवळ पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या रोहिणी, मेनका पासून एकीकडे सॅटलाईट लाँच वेहिकल्स म्हणजेच एसएलव्ही – एएसएलव्ही – पीएसएलव्ही – जीएसएलव्ही पर्यंतचे प्रक्षेपक आणि दुसरीकडे आकाश – अग्नी – पृथ्वी – ब्राह्मोसपर्यंतची क्षेपणास्रे यांनी, आर्यभट्टपासून इन्सॅटपर्यंतच्या उपग्रहांच्या मालिकांनी, त्या क्षेत्रात वेळोवेळी नोंदवलेल्या विविध विश्वविक्रमांनी भारतीय अवकाश संशोधनाच्या परिपक्वतेचे आणि सामर्थ्याचे दर्शन वेळोवेळी जगाला घडविले आहे. एकेकाळी अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि फ्रान्सची बोटे धरून रांगत रांगत केलेला हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. ह्या महासत्ता आपल्याजवळचे ज्ञान आणि तंत्रज्ञान भारताला द्यायला तयार नव्हत्या. सामंजस्य करारातून थोडीफार माहिती दिली जाई तीही हातची राखून दिली जाई. सार्वत्रिकरीत्या उपलब्ध असलेल्या थोड्याबहुत माहितीच्या आधारे आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड परिश्रम घेऊन, कौटुंबिक सुखोपभोग टाळून रात्रंदिवस राबून भारतीय शास्त्रज्ञांनी ह्या सगळ्यासाठीच्या एकेक यंत्रणा आणि उपयंत्रणा विकसित केल्या आहेत हे आपण आधी समजून घेतले पाहिजे. आज जेव्हा आपला एखादा प्रक्षेपक देशी – विदेशी उपग्रहांसह किंवा अवकाशयानासह दिमाखात अंतराळात झेपावतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक भागासाठी, प्रत्येक यंत्रणेसाठी आपल्या शास्त्रज्ञांनी आपले अवघे आयुष्य दिलेले असते याची विनम्र जाणीव आपल्या मनात हवीच हवी.
2003 सालच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताच्या चांद्रमोहिमेची घोषणा केली होती. त्याला त्यांनीच काव्यमय नाव दिले – चंद्रयान! पोखरण अणूस्फोटाच्या पहिल्या वर्धापनदिनी ह्या मोहिमेचे प्रत्यक्ष सादरीकरण झाले आणि भारताला चंद्राचे वेध लागले. तेथवर पोहोचायची ट्रॅजेक्टरी म्हणजे मार्ग निश्चित करण्यापासून पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाची गणिते करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा काटेकोर अभ्यास सुरू झाला. आपले यान थेट चंद्रापर्यंत न पाठवता आधी पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत न्यायचे आणि मग तेथून चंद्राच्या कक्षेत पाठवून वळसे घेत घेत सावकाशीने उतरवायचे ठरले, त्यामागे आर्थिक मर्यादा हेही एक कारण होते. चंद्रयान – 1 मोहिमेतील थेट एमआयपीवर तिरंगा कोरावा ही कल्पना कलामांची होती. 14 नोव्हेंबर 2008 रोजी चंद्रयान 1 च्या माध्यमातून चंद्रावर हा तिरंगा पहिल्यांदा पोहोचला. चंद्राच्या शॅकल्टन क्रेटरजवळ ते यान आदळले आणि नष्ट झाले.
चंद्राचा पृष्ठभाग हा शीतल नसून तो उष्ण असतो ही माहिती आपल्यापासून अमेरिका आणि रशियाने तेव्हा लपवून ठेवली होती, त्यामुळे चंद्राच्या जवळ ते यान जाताच आतील इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचे तापमान वाढून ते नष्ट झाले होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. पण नष्ट होईपर्यंत त्याने आपले काम चोख बजावले. चंद्राच्या जवळजवळ नव्वद टक्के पृष्ठभागाचा हाय रेझल्यूशन नकाशा त्याने तयार केला. चंद्राच्या ध्रुवीय भागात पृष्ठभागाखाली बर्फाचे अवशेष आहेत हा शोध त्याने लावला, ज्याची अवघ्या जगाने दखल घेतली. चंद्रावरील सौर वारे, मॅग्नेशियम, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, कॅडमियम अशी खनिजे, चंद्राभोवतीचे वेगवेगळे वायू यांची मौलिक माहिती त्या मोहिमेत हाती आली. चंद्रावर दिसणारे खड्डे ही प्रत्यक्षात कित्येक किलोमीटर खोल अशी विवरे आहेत आणि कधीकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर लाव्हा वाहिला आहे, हेही त्या मोहिमेतून स्पष्ट झाले.
त्यानंतरचे चंद्रयान – 2 चंद्रावर उतरायला केवळ काही क्षण असताना त्याचा वेग नियंत्रित करता न आल्याने कोसळून नष्ट झाले, तेव्हा अवघा देश दुःखसागरात बुडाला होता. इस्रोच्या संशोधकांच्या दुःखात सहभागी झाला होता. परंतु त्याच दिवसापासून हे वीर पुन्हा कामाला लागले. त्या अपयशाची सगळी कारणे पडताळली गेली आणि पुनश्च हरि ओम्‌‍ म्हणत गेल्या महिन्यात चंद्रयान – 3 चंद्राच्या प्रवासाला निघाले. चंद्रयान – 2 चे ऑर्बिटर तर अजूनही चंद्राभोवती घिरट्या घालत माहिती गोळा करते आहे. आता चंद्रयान – 3 चे विक्रम आणि त्यातील प्रग्यान रोव्हर चंद्रावर अलगद उतरून आपल्या पुढच्या कामाला लागले आहे.
अमेरिका, रशिया आणि चीन या बलाढ्य राष्ट्रांच्या पंक्तीत भारत आता जाऊन बसला आहे. हे यश केवळ तेवढेच नाही. चंद्राच्या आजवर दुर्लभ असलेल्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिलावहिला देश ठरला आहे. तेथील काही विवरे ही कायम सावलीखाली असतात, त्यामुळे तेथील परिस्थितीचा अभ्यास जीवसृष्टीला चालना देणाऱ्या पाण्याच्या अंशाच्या शोधाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरू शकतो. विक्रम लँडरमधील रंभा आणि चॅस्टी आणि प्रग्यानमधील एपीएक्सएस आणि लिब्स यंत्रणा आपापला अपेक्षित अभ्यास करतील. चांद्रमोहीम यशस्वी करणे किती कठीण आहे हे रशियाचे लुना – 25 चंद्रावर उतरताना नष्ट झाले तेव्हा पुन्हा एकवार दिसून आलेच होते. परंतु भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर हे शिवधनुष्य पेलून देशाला गौरवान्वित केले आहे. भारत एवढ्यावरच थांबणार नाही. आता त्याला सूर्याचे वेध लागले आहेत. आदित्य एल – 1 ची मोहीम असो, शुक्रावरची मोहीम असो किंवा मानवी अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या गगनयानची संकल्पित मोहीम असो, इस्रोच्या आणि पर्यायाने भारताच्या शिरपेचात असे अनेक मानाचे तुरे भविष्यात खोवले जाणार आहेत. ह्या यशाचे खरे शिल्पकार असलेल्या इस्रोच्या हजारो शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. –
मुझको सफलता बैठे बिठाए न मिली ।
मैने गुहर तलाशे है दरिया खंगाल कर!