एडवीन नुनीसला पोलीस कोठडी देण्याची हणजूण पोलिसांची विनंती

0
7

>> उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल

भाजप नेत्या, अभिनेत्री सोनाली फोगट मृत्यूप्रकरणाशी संबंधित अमलीपदार्थप्रकरणी अटक केलेल्या कर्लिस शॅकच्या एडवीन नुनीसच्या न्यायालयीन कोठडीप्रकरणी हणजूण पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली असून एडवीन याला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली आहे.

सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी कर्लिस शॅकमधून अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले. त्यामुळे कर्लिसचा एडवीन नुनीस याला अटक करण्यात आली आहे. तसेच अमलीपदार्थ प्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने या प्रकरणी अटक केलेल्या एडवीन व इतरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अमलीपदार्थ प्रकरणी अधिक तपासासाठी एडवीन नुनीस याला पोलीस कोठडी देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसाकडून हरियाणा येथे तपास सुरू आहे. मयत सोनाली फोगट यांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी केली जात आहे. आर्थिक व्यवहार सुधीर करीत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. सोनाली फोगटप्रकरणी चौकशीमध्ये रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सोनाली फोगट यांनी या प्रकरणी अटक केलेल्या सुधीर सांगवान याच्यासोबत दोन ट्रस्टची स्थापना केली आहे, असे तपासात स्पष्ट झाले आहे.