एक उनाड दिवस…!!

0
22
  • – अश्वेता अशोक परब

पायथ्याशी राहून वर पाहिलं की धुक्याची दाट चादर… आणि त्या चादरीत आम्ही अलगद शिरलो होतो. समोरचं विहंगम दृश्य पाहून आमच्या डोळ्याचं पारणं ङ्गिटलं. दमलेली पावलं हवेत तरंगू लागली. झुळझुळणार्‍या वार्‍याने थकवा कुठल्या कुठे पळवला आणि हाच स्वर्ग असावा अशी भारावलेली अवस्था सगळ्यांची झाली!

‘‘कंटाळा आलाय सर… तणावरहित मोठ्या सुट्या कायमच्या विसरलोय; किमान हा तणाव एका दिवसासाठी तरी विसरू द्या… यातून तात्पुरती तरी सुटका करा… प्लिज…’’ जायबंदी झालेल्या कोवळ्या मनातून हुंकार उमटला आणि प्रवास सुरू झाला… अद्भुत अनुभूतीच्या दिशेने… रोज प्रोङ्गेशन आणि प्रोङ्गेशनलच्या नावाखाली घर ते कॉलेज, कॉलेज ते घर… रात्रभर अभ्यास, प्रॉजेक्टस्, असाईमेंटस् नि सकाळी सातला घराबाहेर ते संध्याकाळी सातला घरात! या दुष्टचक्रात अडकलेलो आम्ही तात्पुरता का होईना पण मोकळा श्वास घेणार होतो. आणि या आमच्या भटकंतीरूपी रथाचे सारथी होते आम्हाला नेहमी पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त जगाची सङ्गर घडवणारे आमचे मराठीचे शिक्षक कुलदीप कामत सर!
आमचं गिरीभ्रमण करायचं ठरलं. ट्रॅक टू कसईनाथ. पण हे एवढं सोपं नव्हतं बरं…!! ही शर्यत होती अडथळ्यांची… पहिला खो पडला तोच मुळी कॉलेजच्या दारी. पण आमचे सर नि आम्ही याबाबतीत तितकेच चिवट झालो होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, आम्हाला त्याचा विशेष काही ङ्गरक पडला नाही. उलट आमचा निश्चय मात्र आणखीन दृढ झाला.

आम्ही उत्साही कार्यकर्ते जराही न बावरता पुन्हा कामाला लागलो. श्रावणात जाऊ म्हणता म्हणता बाप्पाचं आगमन झालं आणि आमच्या कार्यक्रमाला जरा ब्रेक लागला. पण चतुर्थी संपता संपता सरांचा मॅसेज ग्रुपवर दाखल झाला आणि पुन्हा उभारी आली. आठवडाभर मग सदस्यांची जमवाजमव सुरू होती. काही येत होते, काही जात होते. येणं-जाणं, रेलचेल सुरू होती. सोबत प्रत्येक गटाला नेमून दिलेले प्रमुख व्यावहारिक कार्यभाग सांभाळत होतेच. त्यात वरूणराजालाही लहर आलेली… तोही अगदी मनसोक्त बरसत होता… अगदी पायथ्याशी पोहोचेस्तोवर…!!
शेवटी तो दिवस उजाडला… रविवार..! माझ्या आयुष्यातला एखाद-दुसरा रविवार असेल हा ज्या दिवशी मी अगदी पहाटे पाचला उठले, तेही गजर न लावता! सात आसमानी जोशात सगळी तयारी केली होती मी… कपडे, बूट, खाऊ सगळं तयार ठेवलं. सकाळी उठून कधी नव्हे ते स्वतःसाठी डबा बनवला. भराभर बाकीची कामं आटोपली. आईबाबांचा निरोप घेतला आणि पहिल्या बसने म्हापसा गाठले. या मोहिमेत ङ्गक्त कॉलेजमध्ये शिकणारेच विद्यार्थी नव्हे तर कॉलेज संपवून वर्ष दोन वर्षं उलटलेले विद्यार्थीदेखील होते. एक वर्ष कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रगती टिचरसुद्धा या सङ्गरीचा भाग होत्या. वाटलं होतं सहभागींचा आकडा बराच मोठा असेल. पण बसमध्ये बसल्यावर कल्पना आली, व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर ङ्गक्त आकडे नाचत होते; प्रत्यक्षात मात्र मूठभरच सेना होती. जरासे निराशेचे ढग दाटू पाहात होते, पण आम्ही सावरलो आणि प्रवासाला सुरुवात झाली… गप्पागोष्टी, गाणी म्हणत तास-दीड तासात आम्ही इच्छित स्थळी येऊन पोहोचलो. तिथे आमच्यासाठी सरांचे जीवलग मित्र संकेत सर, त्यांच्यासोबत नाटेकर सर आणि बरोबर त्यांची विद्यार्थिनी चिमुकली पालवी असे तिघे थांबले होते. ते आजच्या दिवसासाठी या भटकंतीच्या वाटेवर आमचे मार्गदर्शक होते. या डोंगराच्या वाटेवर असलेल्या वनस्पतींची माहिती, या पर्वताशी जोडले गेलेले संदर्भ, आख्यायिका ते आम्हाला सांगणार होते.

त्यांच्या सोबतीने हळुवारपणे कसईनाथाच्या कुशीत शिरलो. माझी गिरीभ्रमणाची ही पहिलीच खेप असल्यामुळे अनुभवींचे अनुभवाचे बोल, आईबाबांच्या सूचना सगळ्या डोक्यात घुमत होत्या. क्षणभर वाटलं, शिवधनुष्य उचलंय खरं, पण नक्की पेलवेल का हे आपल्याला..? जराशी धाकधूक मनात घेऊनच पावलं पडत होती. आजूबाजूला सगळे सवंगडी आणि साथीला अगदी सावलीसारखी खंबीर माझी सखी… या सगळ्यांच्या आधाराने मीही उसनं अवसान आणलं होतं… हात पसरून कुशीत घेण्यासाठी आतुर उभ्या असलेल्या आईच्या दिशेने बाळाने आपली इवली इवली पावलं टाकत झेपावं तसे हळूहळू आम्ही पुढे सरकत होतो. अर्ध्याएक तासाचं अंतर पार झालं आणि श्वास ङ्गुलू लागला. पाय कुठं पडताहेत भान राहिलं नाही. नजर भिरभिरू लागली नि अक्षरशः घामाच्या धारांनी सगळे न्हाऊन निघालो.

सभोवार गर्द हिरवी वनराई, पक्ष्यांचं कुजन, दुरून कानी पडणारी धबधब्याची गाज… तरीही भोवती खेळणारी निःशब्दता मनाला सुखावून जात होती. अशा आल्हाददायक वातावरणात पाय रांगत होते. आताच भोवळ येईल की काय, पाय घसरेल की काय? असा एखादा मध्येच विचार मनात डोकावून जायचा, तोच समोरून मैत्रिणींचे, सरांचे चार धीराचे शब्द कानावर पडायचे आणि पुन्हा हुरूप चढायचा. एक क्षण तर असा आला की आता पुढे जाववत नाहीच म्हणून मी ङ्गतकल मारायची बाकी होते! तेवढ्यात माझी बिचारी सखी पुढे आली आणि स्वतःच्या पाठीवर आधीच वजन असताना ‘तुझ्या पाठीवरचं बोजकं घेते’ म्हणत तिने घेतलंसुद्धा तेव्हा कुठे जरा माझा कणा ताठ झाला आणि मोकळं मोकळं वाटलं. त्यात अजब म्हणजे ते वासरू चक्क एवढं वजन घेऊन हुंदडत वर गेलं आणि मी थकल्या नजरेने ते पाहतच राहिले. तरीही तिला माझी काळजी होतीच. हातात वजन असलं तरी ती भरभर पावलं टाकत होती. तरी ठराविक अंतरावर मी पोहोचेपर्यंत माझ्यासाठी थांबायची आणि मगच पुढं जायची… अशा प्रकारे कधी ससा तर कधी कासव बनत हिरवाईचं आणि कुंद हवेचं उबदार आच्छादन पांघरून आम्ही दीड-दोन तासांत शिखर सर केलं.

पायथ्याशी राहून वर पाहिलं की धुक्याची दाट चादर… आणि त्या चादरीत आम्ही अलगद शिरलो होतो. समोरचं विहंगम दृश्य पाहून आमच्या डोळ्याचं पारणं ङ्गिटलं. दमलेली पावलं हवेत तरंगू लागली. झुळझुळणार्‍या वार्‍याने थकवा कुठल्या कुठे पळवला आणि हाच स्वर्ग असावा अशी भारावलेली अवस्था सगळ्यांची झाली! काही क्षण विसावल्यानंतर शिखरावर सगळी ङ्गुलपाखरं विखुरली… इवल्या पाखरांशी या दोन पायांच्या ङ्गुलपाखरांची जणू शर्यतच लागली होती. सभोवती कितीतरी रंग उधळले होते. हसणं-खेळणं, ङ्गोटो काढणं अशी सगळी करमणूक अर्ध्या तासात आटोपती घेत पुन्हा सगळे उतरणीला लागलो. दोन वाजत आलेले. पोटातले कावळे भुकेने ओरडत होते. पर्वत चढताना मध्यावर असलेल्या धबधब्याच्या काठी बसून जेवायचं ठरलं होतं.
प्रत्येकजण आपापल्या भुकेच्या तीव्रतेप्रमाणे तोल सांभाळत मार्गक्रमण करत होता. माझे पाय तर लटपटायला लागले होते. कधी एकदा कुठेतरी बसून दोन घास पोटात ढकलते असं झालेलं. त्याच गडबडीत एकदा पाय घसरला. नशीब बलवत्तर म्हणून गडगडत खाली गेले नाही… कशीबशी तोल सावरत उभी राहिले. पाय धबधब्याच्या काठाला लागला तेव्हा कुठे जीवात जीव आला.
पुढच्या पंधरा-वीस मिनिटांत सगळ्यांची जेवणं आटोपली आणि धबधब्याच्या दिशेनं आगेकूच केली. दगड-खडकांच्या अंगाखांद्यावरून खाली निथळणारी ती दुग्धधवल पाण्याची धार आणि नितळ आरशासारखं चकाकणारं, खळाळत वाहणारं पात्र पाहून कसं दिल गार्डन गार्डन हो गया! सगळ्यांनी भराभर पाण्यात स्वतःला डुंबवलं. तिथंही थोडीङ्गार ङ्गोटोग्राङ्गी झालीच. गारगार पाण्याच्या स्पर्शानं सगळा शीण दूर झाला. त्या दैवी अनुभूतीनं मन भरतं न भरतं तोच सरांची हाक आली. पाय निघत नसतानाही मनाला आवर घालत सार्‍याजणी वरती आलो आणि पायथ्याच्या दिशेने सगळ्यांनी मोर्चा वळवला. सुरुवातीपासून हवेत कुंद होऊन लपून बसलेला पाऊस नटखट खारूताईसारखा रिमझिमला आणि त्याच्याच सोबतीने सगळे सुखरूप पायथ्याशी पोहोचलो… हा एक समृद्ध अनुभव आयुष्यभरासाठी गाठीशी घेऊन..!!