उमेदवार जाहीर करण्याच्या प्रक्रियेला वेग

0
52

>> कॉंग्रेसचे आणखी ११, तर आपचे ५ उमेदवार जाहीर; तृणमूल कॉंग्रेस पक्षाकडून पहिल्या यादीत ११ जणांना उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. कॉंग्रेसने ११ उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेल्या दोन याद्या काल दिवसभरात जाहीर केल्या. आतापर्यंत पक्षाने २६ उमेदवार घोषित केले आहेत. तसेच आपने देखील चौथी यादी जाहीर करत ५ उमेदवार जाहीर केले. आपने आतापर्यंत ३० उमेदवार जाहीर केले आहेत. नव्यानेच राज्यात दाखल झालेल्या तृणमूलने सुद्धा या स्पर्धेत मागे न राहता आपली पहिली यादी जाहीर करत ११ जणांना उमेदवारी घोषित केली आहे.

कॉंग्रेसने काल जाहीर केलेल्या तिसर्‍या यादीत भाजपमधून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या मायकल लोबो यांना कळंगुटमधून, कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार प्रसाद गावकर यांना सांगेतून आणि तृणमूल कॉंग्रेसमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या लवू मामलेदार यांना मडकईतून उमेदवारी देण्यात आली आहे.
धर्मेश सगलानी यांना साखळी मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. डिचोलीत मेघश्याम राऊत, थिवीत अमन लोटलीकर, पर्वरीत विकास प्रभुदेसाई, सांत आंद्रेत ऍन्थोनी फर्नांडिस, काणकोणात जनार्दन भंडारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रात्री उशिरा जाहीर केलेल्या चौथ्या यादीत नुवेतून आलेक्स सिक्वेरा, तर वेळ्ळीतून सावियो डिसिल्वा यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत २६ मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश देण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. गोवा फॉरवर्डसोबतची आघाडी आत्तापर्यंत तरी आहे. जागांबाबत कॉँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांत आणि गोवा फॉरवर्डमध्ये चर्चा सुरू आहे.

  • दिगंबर कामत,
    आमदार, कॉंग्रेस.

आपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर

आम आदमी पक्षा (आप)ने ५ उमेदवारांचा समावेश असलेली चौथी यादी काल जाहीर केली. त्याचबरोबरच आपने डिचोली मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपने प्रियोळात नोनू नाईक, मडगावात लिंकन वाझ, कुडचडेत ग्राब्रिएल फर्नांडिस, केपेत राहुल परेरा आणि साखळीत मनोज घाडी आमोणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, आपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा बुधवार दि. १९ रोजी केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल झाले आहेत.

तृणमूलकडून फालेरो, आलेमाव, कांदोळकरांना उमेदवारी

तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या राज्य समितीचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी काल आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

फातोर्डा मतदारसंघात तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो, बाणावलीतून चर्चिल आलेमाव व हळदोणा मतदारसंघातून किरण कांदोळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नावेली मतदारसंघात चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव हिला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पर्वरीत संदीप वझरकर, सांत आंद्रेत जगदीश भोबे, कुंभारजुवेत शमील वळवईकर, पर्येत गणपत गावकर, कुठ्ठाळीत गिल्बर्ट रॉड्रिग्स, नुवेत जुझे काब्राल आणि कुंकळ्ळी मतदारसंघात डॉ. जॉर्सन फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे.