>> आयपीबीविषयी दिलेल्या माहितीत तफावत असल्याचा दावा
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची गुंतवणूक, जमीन वाटप आणि रोजगार याबाबत विधानसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीमघील विसंगतीबाबत विरोधी पक्षाच्या आमदारांनी उद्योगमंत्री मावीन गुदिन्हो यांच्यावर काल प्रश्नांचा भडिमार केला.
विधानसभेत जुलै 2023 च्या अधिवेशनात आयपीबीबाबत देण्यात आलेली माहिती फेब्रुवारी 2024 च्या अधिवेशनात सादर केलेल्या माहितीशी सुसंगत नाही. त्या माहितीमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार व्हेन्झी व्हिएगश व इतरांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
मागील पाच वर्षांत 6.41 लाख चौरस मीटर जमीन गुंतवणूक प्रोत्साहन विभाग म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यातील 3.82 लाख चौरस मीटर जमीन नैसर्गिक आच्छादन, जलसिंचन कमांड जागा, ऑचर्ड, शेत जमीन आणि पुरातन संरक्षित स्थळाच्या 100 मीटरच्या जवळ आहे, असे आमदार एल्टन यांनी सांगितले. विधानसभेत प्रश्नाच्या उत्तरात दिलेली माहिती प्रस्ताव मंजुरीवर आधारलेली आहे, असा दावा उद्योगमंत्री गुदिन्हो यांनी केला. गोव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींचा समावेश आहे. गुंतवणूक प्रोत्साहन विभागातील जैवसंवेदनशील विभाग, शेत जमिनींचा सांभाळ केला जाणार आहे. अशा ठिकाणी बांधकामांना परवानगी देताना विशेष काळजी घेतली जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
आयपीबीने मंजूर प्रकल्पांमध्ये वर्ष 2014 पासून एकूण 7872 जणांना रोजगार मिळाला आहे. त्यात 3242 स्थानिक आणि 4630 परप्रांतीयांचा समावेश आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
जुने गोवे येथे आयपीबीने मान्यता दिलेला एक प्रकल्प पुरातन संरक्षित क्षेत्राच्या 100 मीटर जवळ आहे. या प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे, अशी ग्वाही मंत्री गुदिन्हो यांनी दिली. हा मुद्दा आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी उपस्थित केला होता.