उत्तर प्रदेशमध्ये दोन साधूंची हत्त्या

0
260

महाराष्ट्रातील पालघर येथील साधूंची झालेली हत्त्या ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात पुन्हा दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे. गावातील मंदिरात दोन साधूंचे मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बुलंदशहर जिल्ह्यातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास होते. दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करत होते. सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.