उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

0
305
  • – कालिदास बा. मराठे

संपूर्ण भारत परिक्रमा सोडल्यास नर्मदा परिक्रमा ही सर्वात मोठी आणि अवघड परिक्रमा आहे.
संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी तीन वर्षे, तीन महिने, तेरा दिवस आहे. अशी परिक्रमा ओंकारेश्‍वर येथून सुरुवात करून तिथेच समाप्त केली जाते.

आपला भारत देश अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेला आहे. मग तो धर्म असो, संस्कृती असो, पशुपक्षी असोत, वृक्षसंपदा असो, डोंगर-नद्या असोत… ‘जननी जन्मभूमिश्‍च स्वर्गादपि गरीयसी’ म्हटलंय ते उगाच नाही. अशा देशाची ओळख करून घ्यायची असेल तर पूर्व-पश्‍चिम, उत्तर-दक्षिण प्रवास करावा लागेल आणि त्यासाठी हा जन्म काही पुरणार नाही.

परंतु आपल्या धर्मामध्ये ज्या मुख्य यात्रा सांगितल्या आहेत त्या केल्या तर सारा भारत देश बघून झाला असे मानण्यात येते.
‘भारतातील तीर्थयात्रा’ या सौ. गीता आदिनाथ हरवंदे यांच्या पुस्तकात त्यांनी यात्रांसंबंधी माहिती दिली आहे ती अशी-
१) अष्टविनायक यात्रा, २) चारधाम यात्रा, ३) बारा ज्योतिर्लिंग यात्रा, ४) देवीच्या साडेतीन पीठांची यात्रा, ५) सप्तपुत्र्यांची यात्रा, ६) पंचमहा सरोवराची यात्रा, ७) चतुरायुद्ध क्षेत्रांची यात्रा, ८) पंचमहाभुतांची यात्रा, ९) त्रिस्थळी यात्रा, १०) एकावन्न शक्तिपीठांची यात्रा, ११) सप्त मुक्तिधाम यात्रा.
या यात्रांप्रमाणेच नदी, तीर्थस्थाने यांची परिक्रमा करणे पण पुण्यदायक मानले जाते. आपल्या संस्कृतीत प्रदक्षिणा घालणे हा एक महत्त्वाचा उपासनेचा प्रकार सांगितला आहे. देवाबद्दलची भक्ती, प्रीती, आदर, कृतज्ञता इत्यादी भावनांचे प्रकटीकरण म्हणून त्या देवांभोवती चहुबाजूंनी प्रदक्षिणा घालणे, ज्यात उजवीकडून डावीकडे वर्तुळाकार चालत जाऊन पुन्हा मूर्तीसमोर येऊन नमस्कार करायचा असतो. ज्याप्रमाणे मंदिरात प्रदक्षिणा घातली जाते, तशीच गाई, औदुंबर, पिंपळ, वड, कडुलिंब, तीर्थस्थाने अशा ठिकाणांभोवती प्रदक्षिणा घालणे याला परिक्रमा म्हणतात. नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा, ब्रज परिक्रमा, त्र्यंबक परिक्रमा प्रसिद्ध आहेत.

संपूर्ण भारत परिक्रमा सोडल्यास नर्मदा परिक्रमा ही सर्वात मोठी आणि अवघड परिक्रमा आहे.
संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी तीन वर्षे, तीन महिने, तेरा दिवस आहे. पूर्वी ही परिक्रमा पायीच पूर्ण केली जात असे. आता सायकल, मोटार, बस या वाहनांचा उपयोग करून ही परिक्रमा १०८ दिवसांत, १५ दिवसांत पूर्ण केली जाऊ शकते. अशी परिक्रमा ओंकारेश्‍वर येथून सुरुवात करून तिथेच समाप्त केली जाते. हे सारे अंतर सुमारे ३८०० किलोमीटर आहे.
अशी नर्मदा परिक्रमा ही एक अतिशय प्राचीन परंपरा आहे. या परिक्रमेच्या मार्गात एक हजाराहून अधिक तीर्थस्थाने आहेत. प्राचीन काळी मार्कण्डेय ऋषींनी, तर आधुनिक काळात वासुदेवानंद सरस्वती यांनी संपूर्ण नर्मदा परिक्रमा केली होती. संपूर्ण नर्मदा परिक्रमेसंबंधी श्री. जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेली दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक आहे- ‘नर्मदेऽऽ हरहर’ आणि दुसरे आहे- ‘साधनामस्त.’ पहिले पुस्तक वाचले त्यावेळी अशी नर्मदा परिक्रमा करायला हवी असे वाटले. परंतु इतके मोठे अंतर आणि इतका मोठा कालावधी देणे माझ्यासारख्या सामान्याला शक्य नाही हे लक्षात आले आणि त्यामुळे देशातील इतर ठिकाणी प्रवास करण्याचा प्रयत्न सेवानिवृत्ती घेतल्यापासून केला.

संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणे ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी चैत्र महिन्यात तीन दिवसांची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यास संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य मिळते असा समज आहे. यासंदर्भात कर्दळीवन सेवा संघ, पुणे यांच्याशी संपर्क साधला. एप्रिल महिन्यात चार वेळा पुणे ते पुणे अशी बसने तीन दिवसांची ही सहल होती. त्यांनीच प्रकाशित केलेले प्रा. क्षितिज पाटकुले यांचे ‘तीन दिवसांची नर्मदा परिक्रमा’ हे पुस्तक वाचायला मिळाले. त्यामध्ये या तीन दिवसांच्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसंबंधी सविस्तर माहिती होती. या पुस्तकाला स्वामी गोविंददेव गिरी यांची प्रस्तावना आहे. मनोगतात लेखकांनी ‘जे जे आपण अनुभवावे, ते ते इतरांना सांगावे’ या न्यायाने आपल्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचे सविस्तर वर्णन केले आहे. नर्मदा नदीची उत्पत्ती, तिची अनेक नावे, त्यासंबंधीच्या कहाण्या, नर्मदा नदीसंबंधी श्री शंकराचार्य यांचे स्तोत्र, नर्मदेची आरती, तटावरील सर्व मंदिरे, आश्रम यांची सविस्तर माहिती चित्रांसहीत दिली आहे.
तिलकवाड्याच्या विष्णुगिरी महाराजांनी ‘प्रथम ही परिक्रमा फक्त आठ जणांनी केली आणि आता ही संख्या वाढत असली तरी फार थोड्या भाविकांना यासंबंधी माहिती आहे’ असे सांगितले. त्यांच्याच या पुस्तकाचा आधार घेऊन मी पुढील माहिती देत आहे.
कोणतीही नदी एका दिशेकडून दुसर्‍या दिशेने नैसर्गिकरीत्या वाहते. जगातील सर्व नद्या या समुद्राच्या दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्‍चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात.

परंतु संपूर्ण पृथ्वीवर फक्त दोनच नद्या त्यांच्या प्रवासमार्गामध्ये अचानक उत्तर दिशेला वळतात व उत्तरवाहिनी बनतात; आणि नंतर परत दक्षिणेकडे वळतात आणि पुनश्‍च आपल्या मूळ प्रवाहमार्गावर वाहतात. या दोन नद्या आहेत गंगा आणि नर्मदा.
जिथे नदी उत्तर दिशेला वाहते म्हणजे ज्या ठिकाणी त्या उत्तरवाहिनी बनून वाहतात ते क्षेत्र अत्यंत पावन, पवित्र आणि मोक्षदायी असते अशी लोकांची श्रद्धा आहे.

काशी येथे वरुण घाटाजवळ गंगा नदी उत्तरवाहिनी बनली आहे. तेथून ती शेवटच्या म्हणजे ऐंशीव्या घाटापर्यंत उत्तरवाहिनी आहे. म्हणून ती तेथे अतिशय पवित्र मानली जाते. वरुणघाट ते ऐंशीवा घाट म्हणून ‘वरुणऐंशी’ आणि त्याचाच अपभ्रंश होऊन त्या ठिकाणाला ‘वाराणसी’ असे नाव पडले आहे. अशा वाराणसीला गंगेच्या किनारी स्नान केल्यानंतर सर्व प्रकारची पापे धुवून निघतात आणि पापक्षालन होते अशी लोकांची श्रद्धा आहे. याबाबतीत एक कथा सांगितली जाते. अगणित भक्त येतात, तिथे स्नान करतात, मात्र त्यामुळे गंगा नदी स्वतः दूषित होते. ती अमंगल होते. यामुळे खूप दुःखीकष्टी झालेली गंगा नदी शिवशंकराला शरण जाते नि सांगते, ‘‘भक्ताच्या पापांचे, दुष्कर्मांचे ओझे वाहून मी अपवित्र झाली आहे. माझी शुद्धी कशी होणार ते सांगा!’’ त्यावर भगवान शंकर तिला सांगतात की, ‘‘नर्मदा नदी जिथे उत्तरवाहिनी होऊन वाहते तिथे जाऊन त्यामध्ये स्नान कर म्हणजे तू शुद्ध होशील. तुझ्यामध्ये साठलेली सर्व पापे निघून जातील. तू पुन्हा निर्मळ आणि पवित्र होशील.’’ त्याप्रमाणे गंगा नदी नर्मदा नदीला उत्तरवाहिनी वाहण्याच्या ठिकाणी प्रकट होऊन मिळते आणि तिथे स्नान करून स्वतः शुद्ध आणि पवित्र होते.
जे पुण्य गंगा नदी उत्तरवाहिनी वाहत असल्याने वाराणसी येथे मिळते, तेच पुण्य नर्मदा नदी गुजरातमधील तिळकवाडा येथे उत्तरवाहिनी होऊन वाहत असल्याने मिळते. तिलकवाडा ते रामपुरापर्यंत नर्मदा नदी उत्तरवाहिनी असते. त्यामुळे तिलकवाडा- रामपुरा- तिकलवाडा अशी उत्तरवाहिनी नर्मदा नदीच्या प्रदक्षिणा घालण्याला ‘उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा’ असे म्हणतात.
अशी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र महिन्यात केल्यास अधिक पुण्य मिळते अशी दृढ श्रद्धा आहे. संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पहिली पायरी म्हणूनही या उत्तरवाहिनी (जी तीन दिवसांची आहे) नर्मदा परिक्रमेकडे पाहिले जाते. श्री. जगन्नाथ कुंटे यांचे ‘नर्मदेऽऽ हर हर’ हे पुस्तक वाचल्यापासून अशी परिक्रमा करण्याची ओढ मनात होती.

परंतु योग यावर्षी आला. संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणे आता या वयात (पंचाहत्तरीनंतर) शक्य नाही आणि तीन दिवसांची उत्तरवाहिनी परिक्रमा केल्यास संपूर्ण परिक्रमेचे पुण्य मिळते या प्रा. पाटकुळे यांच्या पुस्तकातील विधानामुळे ही संधी घ्यायलाच हवी असे वाटले. परंतु या पुण्यापेक्षा नर्मदा नदीच्या उत्तर-दक्षिण तीरांवरून २१ किलोमीटर पायी प्रवास- ज्यामध्ये दोन वेळा नावेने नदी ओलांडण्याचे, वाटेतील विविध तीर्थस्थाने आणि आश्रमांना भेट देण्याचे आकर्षण जास्त वाटले.

त्याशिवाय राजपिपला शहराजवळ साधू बेटावर उभारण्यात आलेला विश्‍वातील सर्वात उंच पुतळा- सरदार वल्लभभाई पटेल- पोलादी पुरुष- ज्याचे नावच आहे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’- एकतेचा पुतळा पाहण्यासाठी नेले जाईल असे त्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात म्हटले होते. या सहलीतील हा मला जादा बोनस- बक्षिसी महत्त्वाची वाटली.

त्यामुळे २२ एप्रिल ते २४ एप्रिलला जाणार्‍या पुणे ते पुणे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी नाव नोंदविले.
एकवीस किलोमीटरचा पायी प्रवास या सहलीत करायचा होता. अर्थात ज्यांना हे जमणार नाही त्यांना रिक्षा देऊन ही परिक्रमा करण्याची सोय होती. परंतु ‘दोन पाय हेच सुंदर वाहन, इच्छाशक्ती हेच त्याचे इंधन’ या कोण्या कवीने म्हटलेल्या विधानावर विश्‍वास ठेवून जीवनात मी रोज हा अनुभव घेत असतो (कारण मी कोणतेच वाहन चालवत नाही). २००८ साली मिरज-पंढरपूर ही १३२ किलोमीटर अंतराची कार्तिकीवारी करण्याचा आणि २०१८ साली गिरनारला चढण्या-उतरण्याचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे २१ किलोमीटर एकाच दिवशी चालण्याचा अनुभव ‘किस पेड की पत्ती!’
२२ एप्रिलला सकाळी आठ वाजता पुण्याहून निघून गुजरातमधील मंगरोल येथे रात्री आठ वाजेपर्यंत पोहोचायचे होते आणि २३ एप्रिलला पहाटे ५ वाजता उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात करायची होती. दुपारी दोन वाजेपर्यंत ही परिक्रमा पूर्ण करून सायंकाळी गरुडेश्‍वर, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा व नर्मदा आरती कार्यक्रम करायचा होता. परंतु वाहनाच्या तांत्रिक दोषामुळे पुण्याहून आम्हा प्रवाशांना घेऊन निघणारी बस दुपारी दोन वाजता निघाली आणि दुसर्‍या दिवशी दुपारी एक वाजता मंगरोल येथे पोहोचली. त्यामुळे सायंकाळचा- श्री गरुडेश्‍वर, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि नर्मदा आरतीचा कार्यक्रम केला. परिक्रमेचा कार्यक्रम तिसर्‍या दिवशी म्हणजे २४ एप्रिलला करायचा ठरले.

भोजन केल्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्री गरुडेश्‍वर मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे यांच्या समाधीमंदिराला भेट दिली. त्यानंतर राजपिपला शहराजवळ असलेल्या साधू बेटाकडे गेलो. नर्मदा धरणावरील हा एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) पाहायला गेलो. हे सरदार वल्लभभाई पटेलांचे स्मारक सुमारे २०,००० चौरस मीटर क्षेत्रावर पसरले आहे आणि १२ चौरस किलोमीटर आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे आणि प्रसिद्ध शिल्पकार श्री. राम सुतार यांनी त्याची रचना केली आहे.
३१ ऑक्टोबर २०१४ मध्ये या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली आणि १ नोव्हेंबर २०१८ रोजी माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

हे स्मारक संपूर्णपणे पाहण्यासाठी एक दिवस हवा. आमच्याकडे एकच तास असल्याने फक्त पायापर्यंत जाऊन परत आलो. पायथ्यापर्यंत जाण्यासाठी वाहनतळापासून स्मारक समितीतर्फे खास बसेसची सोय करण्यात आली आहे. थंड पाणी मोफत मिळण्याची सोय आहे. याच ठिकाणी आठवण म्हणून खास पाणी साठवण्यासाठी बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. एक बाटली पन्नास रुपयाला आहे.

याच स्मारकाच्या आसपास अनेक भेट देण्यासाठी स्थळे विकसित केली आहेत, जी पाहण्यासाठी दोन दिवस हवे होते. नर्मदा आरतीसाठी रात्रौ ८ वाजता घाटावर गेलो. तिथे आरतीसाठी खास गायक-वादक व आरती करण्यासाठी पाच ठिकाणी व्यवस्था होती.
दुसर्‍या दिवशी म्हणजे २४ एप्रिलला सकाळी साडेचार वाजता संकल्प सोडून परिक्रमेला मंगरोल येथून सुरुवात केली. परिक्रमेच्या मार्गात परिक्रमा करणार्‍या भक्तांसाठी चहा-कॉफी, न्याहरीसाठी खमंग ढोकळा, भजी, पुरीभाजी, ताक, पिण्यासाठी पाणी आदींचे ठिकठिकाणी गाळे उभारले होते. ही सेवा निःशुल्क होती. कारण सेवा म्हणून ही मंडळी हे काम करत होती.

आमच्याबरोबर असलेल्या १०५ जणांपैकी २० जणांनी रिक्षा हे साधन वापरून परिक्रमा पूर्ण केली. आमच्यासारख्या इतरांनी ती पायी पूर्ण केली. दक्षिण तटावर असलेल्या मंगरोल येथून परिक्रमेचा संकल्प करून सुरुवात केली. वाटेत असलेल्या मंदिर आणि आश्रमांना भेटी देऊन गुवारकडे निघालो, जिथे नावेने नर्मदा नदी ओलांडून तिलकवाडाकडे उत्तर तटावर पोहोचायचे होते. वाटेत नर्मदा नदीत स्नान करून तिचे पूजन केले. गुवारकडे जाणारा हा मार्ग दगडधोंड्यातून, खरे तर नर्मदेच्या गोट्यातून जातो.
रविवारचा दिवस असल्याने आमच्यासारख्या अनेक यात्रेकरूंची तीरावर गर्दी होती. नावा चारच होत्या. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकच पोलीस होता. खरे तर स्थानिक प्रशासनाने अशा यात्रेच्या काळात अधिक बंदोबस्त ठेवायला हवा होता. त्यामुळे या ठिकाणी अडीच तास नावेसाठी थांबावे लागले. अंतर फक्त दोन मिनिटांचेच होते.

तिळकवाड्याहून कपिलेश्‍वर, वारून आणि सर्वात शेवटी रेंगण येथे नावेने दक्षिण तटावर रामपुरा येथे जायचे होते. हे अंतर सुमारे १४ कि.मी. आहे. हा रस्ता गावातून, जंगलातून व शेवटी नर्मदा नदीच्या काठाकाठाने जात होता. वाटेत तिलकेश्‍वर, नर्मदामाता, मणिनागेश्‍वर, कपिलेश्‍वर, कामेश्‍वर मंदिरांना भेट दिली.
रेंगण येथे नर्मदेचे विस्तृत पात्र असल्याने छोट्या होडीतून जायला थोडा जास्त वेळ लागला. दक्षिण तटावर असलेल्या धनेश्‍वर, रणलोडराय, लुंकेश्‍वर, गोपाळेश्‍वर मंदिरांना व तपोवन आश्रम, रामानंद आश्रम, सीताराम बाक्ष आश्रमांना भेट देऊन मंगरोल येथील निवासस्थानी दुपारी एक वाजता पोहोचलो. परिक्रमा पूर्ण करून आल्यावर कुमारीला पूजन करून भंडारा करण्याची पद्धत आहे. ती पूर्ण केली आणि नर्मदा परिक्रमेची सांगता भोजन घेऊन केली. दुपारी तीन वाजता त्याच दिवशी पुण्याकडे यायला निघालो व २५ एप्रिलला दुपारी १२ वाजता पुण्यात पोहोचलो.
अशा नर्मदा परिक्रमेवर परिक्रमा केलेल्या अनेकांनी आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. कर्दळीवन सेवा संघाने श्री. मोहन वा. केळकर यांचे संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

चैत्र महिन्यात संकल्प करून वर्षभरात कधीही ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करता येईल. मी बायकांना विनंती करतो की हा तीन दिवसांचा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा अनुभव त्यांनी जरूर घ्यावा. जे तरुण आहेत त्यांनी पायी, सायकल, मोटार अथवा बसने पण संपूर्ण नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्यावा.
‘नर्मदेऽऽ हर हर|’