उकिरडे

0
5
  • (क्षणचित्रं… कणचित्रं…)
  • प्रा. रमेश सप्रे

‘सर, इथला कचरा गेल्याशिवाय बाहेरचा उकिरडा स्वच्छ होणार नाही.’ किती खरंय हे! नकारात्मकता, बेशिस्त, स्वार्थ, दुसर्‍याबद्दलची अनास्था हा आतला कचरा दूर झाला तरच बाहेर उकिरडे निर्माण होणार नाहीत.

रस्त्यावरून दोघंजण चाललेत. अपरिचित आहेत. एकजण केळं खाऊन साल रस्त्यावर टाकतो. तशी ही नेहमीचीच गोष्ट; जन्मसिद्ध अधिकारासारखी. पण तो दुसरा साल टाकणार्‍याला विचारतो. त्यानंतरचा संवाद असा-
तो विचारतो, ‘‘रस्त्यावर केळ्याची साल का टाकलीत?’’ दुसरा म्हणतो, ‘‘रस्ता काय तुझ्या बापाचा आहे? वाटल्यास उचल.’’ यावर पहिला उद्गारतो, ‘‘मी का उचलू? रस्ता काय माझ्या बापाचा आहे?’’

  • या प्रसंगातून एक गोष्ट कळलीच असेल की रस्त्याला बाप नाही. तो अनौरस (बेवारशी) आहे. म्हणूनच रस्त्याच्या कडेला अखंड मैलोमैल कचरा पसरलेला दिसतो. तसा सगळीकडेच दिसतो; पण पर्यटकांचं नंदनवन असलेल्या आपल्या भांगराच्या गोव्यात तर तो पदोपदी जाणवतो. विशेषतः हाय-वे (महामार्ग), बायपास (बगलमार्ग) यांच्या दोन्ही बाजूंना कचर्‍याची सुंदर रांगोळी घातलेली दिसते. जनावरांनी कचरा भरलेल्या पिशव्या फाडून आतला कचरा सर्वत्र पसरवला की व्वा! काय छान दिसतं साम्राज्य कचर्‍याचं!

नंदनवनाचा उकिरडा (नरक) कोण बनवतं? मिल्टन नावाच्या आंग्ल कवीनं म्हटलंय, ‘मनच बनवतं स्वर्गाचा नरक… आणि नरकाचा स्वर्ग.’ हात नाही कचरा फेकत, पाय नाही कचरा पसरवत; मन-बुद्धीवरचे संस्कार, स्वयंशिस्त असेल तर आपल्या शिंगापूरचं सिंगापूर व्हायला वेळ लागणार नाही.

डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना सिंगापूरला गेले होते. तेथील स्वच्छ रस्ते, उद्यानं, सार्वजनिक स्थानं पाहून ते प्रभावित झाले. ‘असं आपल्या देशात कधीही घडणार नाही’ असं म्हणणार्‍या तुच्छतावाद्यांना उद्देशून त्यांनी एका लेखात अनेक प्रश्‍न विचारले होते नि शेवटी निवेदनपूर्वक काही प्रतिज्ञा करण्याचं आवाहनही केलं होतं.

कचर्‍याच्या अनेक कुंड्या जागोजागी उभारलेल्या असतात. आता तर प्लास्टिकच्या चाकं असलेल्या मोबाईल कुंड्या (डस्टबिन्स) असतात. पण बर्‍याच वेळा त्या रिकाम्या असतात आणि त्यांच्या अवतीभवती छान उकिरडा निर्माण झालेला असतो. कारण कुंडीच्या जवळ न जाता फेकलेला कचरा!
काही वर्षांपूर्वी एक अभिनव अभियान सुरू केलं गेलं होतं. नाव होतं- फक्त एक पाऊल पुढे! -या अभियानाचा उद्देश होता कचराकुंड्यांचा नीट वापर होऊन त्यांच्या आजूबाजूला उकिरडा निर्माण न होणं! लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कारण कचरा कुंडीत टाकणारा पहिला माणूस जो एक पाऊल दूर उभा राहून टाकत होता तो कुंडीजवळ जाऊन कचरा व्यवस्थित टाकू लागल्यामुळे नंतर येणारी दुसरी-तिसरी माणसंही कुंडीजवळ जाऊन सारा कचरा नीट कुंडीतच टाकू लागली.

या अभियानाची दुसरी पायरी म्हणून कचराकुंड्या आकर्षक रंगानं रंगवून सजवल्या गेल्या नि त्यावेळच्या प्रसिद्ध सिनेनट्यांची नावं दिली गेली. कुणीही विरोध केला नाही. कारण त्याकाळचा समाज समजूतदार होता. हा काळ फार मागचा नाही बरं का!
आपल्या देशात काही फार मजेशीर चालीरीती आहेत. एखाद्याचं मूल जगत नसेल तर त्याला मर्तू, केरपुंजा, उकिरडा अशी नावं ठेवली जात. ‘लगान’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘कचरा’ नावाचा हात वाकडा असलेला खेळाडू आठवत असेलच. गोलंदाजी अशी विचित्र करायचा की फलंदाजालाच काय त्याला स्वतःला आपला चेंडू कुठं पडणार हे कळायचं नाही. संघाच्या विजयात या कचर्‍याची कामगिरी नजरेत भरण्यासारखी होती. असो.

याचा अर्थ उकिरडा टाकाऊ, त्याज्य नाही असा अर्थातच नाही. उकिरडा म्हणजे धरतीवरचा नरकच. शहरातील शिकलेल्या, श्रीमंत लोकांचा कचरा गरिबांपेक्षा अधिक नि विविध प्रकारचा असतो.
देवपूजा करणार्‍या भक्तभाविकांचा आपला देश. पण उत्सवानंतर निर्माल्य, मूर्ती सजावटीचं सामान यांचा केवढा उकिरडा करतो आपण? हवा-पाणी-जमीन सार्‍यांचं महाभयानक प्रदूषण आपण करत असतो. मुख्य म्हणजे बहुसंख्य जनतेला याचं काही वाटतच नाही! आता हळूहळू यासंबंधी जाणीव-जागृती होऊ लागलीय. पण अगदी अल्प. दर्या में खसखस!

एक आशेचा किरण दिसू लागला. ‘कचर्‍याचं व्यवस्थापन’ (गारबेज मॅनेजमेंट)! ओला कचरा- सुका कचरा गोळा करून, त्याच्यावर प्रक्रिया करून अनेक ठिकाणी कचर्‍यापासून होणार्‍या खतावर सुंदर बागा तयार केल्यायत. नाचणारी कारंजी, साथीला ठेक्यातलं संगीत नि रंगीबेरंगी प्रकाशझोत यांनी अनेक सुंदर स्थळे (ब्यूटी स्पॉट) निर्माण केली जाताहेत. मुलांना- युवकांना या सार्‍या कचर्‍यावर केल्या जाणार्‍या प्रक्रियांची माहिती देऊन आपल्या परिसरात अशा जागा निर्माण करण्याची प्रेरणा दिली जातेय. कचर्‍याचं हे मूल्यवर्धन (व्हॅल्यू ऍडिशन) खतं इ. विकून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीही, किंचित लाभदायकही ठरतंय. बेरोजगारांनी अशीही ‘स्टार्ट अप्स्’ सुरू करायला काय हरकत आहे? जहॉं चाह, वहॉं राह! महात्मा गांधीजींनी मैल्याला (विष्ठेला) सोनखत म्हणून प्रतिष्ठा दिली नव्हती का? असो.
एका नाटकात एक हृदयस्पर्शी नि मस्तकदंशी वाक्य आहे. बर्‍याच वर्षांनी भेटलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला त्याचे शिक्षक विचारतात, ‘काय करतोस रे आजकाल?’ यावर त्या शिकलेल्या, बेरोजगार, काहीशा वैफल्यग्रस्त झालेल्या युवकाचं उत्तर होतं, ‘काही नाही सर, आयुष्य नेम धरून उकिरड्यावर फेकतोय.’ तो अर्थातच जीवनाच्या झालेल्या उकिरड्याबद्दल बोलत होता हे सांगायला नको. एका संस्कार वर्गात हा ‘कचरा-उकिरडा’ विषय चर्चेला घेतला असताना एक शिबिरार्थी स्वतःच्या डोक्याला हात लावून म्हणाला, ‘सर, इथला कचरा गेल्याशिवाय बाहेरचा उकिरडा स्वच्छ होणार नाही.’ किती खरंय हे! नकारात्मकता, बेशिस्त, स्वार्थ, दुसर्‍याबद्दलची अनास्था हा आतला कचरा दूर झाला तरच बाहेर उकिरडे निर्माण होणार नाहीत. बघा विचार करून.