इलेक्ट्रिक बसेसमुळे इतरांचा व्यवसाय थंडावला

0
7

स्मार्ट सिटी योजनेखाली पणजीतील अंतर्गत भागात चालविण्यात येत असलेल्या कदंब वाहतूक महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसमुळे मोटरसायकल पायलट, रिक्षाचालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, त्यावर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल गोवा बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.कदंब महामंडळाच्या मिनी बसेस पणजी परिसरातील आल्तिनो, जुन्ता हाऊस आदी अंतर्गत भागातून वाहतूक करीत असल्याने मोटरसायकल पायलट, रिक्षाचालकांना मिळणाऱ्या प्रवाशांमध्ये घट झाली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, असे ताम्हणकर यांनी सांगितले. राज्य सरकारने पणजी परिसरातील ताळगाव, मिरामार, दोनापावल, सांताक्रूझ, बांबोळी आदी भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस बंद करण्याचा आदेश जारी केला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याने अखेर राज्य सरकारला या विषयावर माघार घ्यावी लागली. सरकारने कदंब महामंडळाच्या बसगाड्यांना प्राधान्य देताना खासगी बसमालकांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तसेच, मोटरसायकल पायलट, रिक्षाचालकांना विश्वासात घेण्याची गरज आहे, असेही ताम्हणकर यांनी सांगितले.