इटलीहून खास विमानांनी खलाशी गोव्यात

0
131

इटलीमध्ये अडकलेल्या ४१४ गोमंतकीय खलाशांना घेऊन येणार्‍या तीन विशेष चार्टर विमानांपैकी पहिले विशेष चार्टर विमान १६८ जणांना घेऊन काल बुधवारी सकाळी १०.३० वा. तर दुसरे विमान संध्याकाळी पाचच्या दरम्यान १६७ जणांना घेऊन दाखल झाले. एकूण ३३५ गोमंतकीय खलाशी काल गोव्यात दाखल झाले.
या खलाशांना गोव्यात आणण्यासाठी मे. कॉस्ता क्रूज कंपनीने विदेशी व्यवहार मंत्रालयामार्फत गृहमंत्रालयाकडे विनंती केली होती.

ती विनंती मान्य झाल्यानंतर तसेच इटलीहून येणार्‍या चार्टर विमान गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर ही दोन विमाने काल दाखल झाली. विमानतळावर पोचल्यानंतर खलाशांचे त्यांचे कोविड – १९ साठी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर तेथे उपलब्ध करण्यात आलेल्या दोन बसमधून त्यांना पोलीस सुरक्षेत क्वारंटाईन केंद्रावर नेण्यात आले. मुरगावचे उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई तसेच इतर संबंधित अधिकार्‍यांनी उपस्थित राहून व्यवस्थेची पाहणी केली.

दरम्यान, रात्री अन्य एक खास चार्टर विमान इटलीहून उर्वरित गोमंतकीयांना घेऊन येणार असल्याची माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.

इटलीच्या १०० जणांना पाठवणार
दरम्यान, इटलीहून गोमंतकीयांना घेऊन येणार्‍या तिसर्‍या विमानातून गोव्यात अडकलेल्या इटलीतील १०० नागरिकांना परत पाठवण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे ते अडकले होते. आतापर्यंत सात हजाराहून जास्त पर्यटकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. रशिया, स्पेन, ब्रिटन, इस्त्राईल, जर्मनी, आदी राष्ट्रांतील पर्यटकांना ३७ खास विमानातून मायदेशी पाठवण्यात आले आहे.

ट्रुनेट चाचणीत एक खलाशी कोरोनाबाधित
इटलीहून सकाळी आलेल्या पहिल्या विमानातील एका खलाशाची ट्रुनेट चाचणी कोरोनाबाधित आली आहे. तर रेल्वेगाडीतूनही आलेल्या एका प्रवाशाची ट्रुनेट चाचणी सकारात्मक आली आहे. दुजोरा मिळवण्यासाठी गोमेकॉत स्वॅब नमुना पाठवण्यात आला आहे. ट्रुनेट चाचणीत आणखी दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेतील त्या दोघांच्या लाळेच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे.

मोफत विलगीकरणासाठी
खलाशांची याचिका

सामाजिक विलगीकरणासाठी राज्य सरकारकडून देण्यात येणारी सेवा मोफत असावी तसेच सामाजिक विलगीकरणासाठीचे आपले दिवसही कमी केले जावेत या मागणीसाठी विदेशातून राज्यात परतलेल्या गोमंतकीय खलाशांनी उच्च न्यायालयात याचिका दखल केलेली आहे. या याचिकेवर येत्या ६ जून रोजी सुनावणी होणार आहे, असे सूत्रानी सांगितले.