इंडिया लिजंड्‌सच्या विजयात पठाण चमकला

0
123

अनऍकॅडमी आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमवर इंडिया लिजंड्‌स संघाने आपली विजयी मालिका कायम राखताना श्रीलंका लिजंड्‌स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. इरफान पठाणच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाला हा विजय संपादन करता आला. पठाणने फलंदाजीत नाबाद ५७ तर गोलंदाजीत १ बळी घेतला.

संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलकरत्ने दिलशान आणि रोमेश कालुवितरणा या माजी लंकन जोडीने आश्वासक सुरुवात केली. मात्र मुनाफ पटेलने दिलशानला मोहम्मद कैफकरवी झेलबाद करत लंकेला पहिला धक्का दिला. यानंतर पठाणने कालुवितरणाला पायचीत केलं. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचे फलंदाज मैदानात फारसा तग धरु शकले नाहीत. मुनाफ पटेलने ४ बळी घेत लंकेची फलंदाजी फळी कापून काढली. मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या प्रयत्नामुळे लंकन संघाने १३८ धावांपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. केवळ १९ धावांत भारताने सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह हे आघाडीचे ३ फलंदाज गमावले. वीरु वैयक्तिक ३ धावांवर धावबाद झाला तर सचिनला भोपळाही फोडताआला नाही. युवराज सिंग केवळ एका धावेचे योगदान देऊ शकला. यानंतर मोहम्मद कैफ (४६) आणि संजय बांगर (१८) यांनी छोटेखानी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. रंगना हेराथने संजय बांगरला पायचीत करत भारताला चौथा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने कैफही सचित्रा सेनानायकेच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मोक्याच्या क्षणी भारताने निम्मा संघ गमावल्यामुळे सामना हातातून निसटणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र इरफान पठाणने मनप्रीत गोनीच्या साथीने फटकेबाजी करत सामन्याचे चित्रच पालटवले. पठाणने लंकन गोलंदाजांना आपला इंगा दाखवत ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५७ धावा केल्या. त्याच्या याच तुफानीच्या खेळाच्या जोरावर इंडिया लिजंड्‌स संघाने ८ चेंडू राखत सामना खिशात घातला. अष्टपैलू खेळासाठी इरफान पठाणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.