आम आदमी पक्षाचे राज्यपालांना निवेदन

0
5

आम आदमी पक्षाचे आमदार व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल गोव्याचे राज्यपाल पी. एन. श्रीधरन पिल्लई यांची राजभवनवर भेट घेतली व गोव्यात सध्या गाजत असलेल्या सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणाची सविस्तर व अगदी खोलात जाऊन चौकशी व्हावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे त्यांच्याकडे केली.
राज्यपालाची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर व इतरांचा समावेश होता.

या घोटाळ्याची व्याप्ती ही फार मोठी असून, त्यामुळे राज्यपालांनी यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बोलावून घ्यावे व त्यांना या घोटाळ्यासंबंधीच्या तपासाबाबत विचारणा करावी, अशी मागणीही आपने केली. या नोकरी घोटाळा प्रकरणात भाजपच्या कित्येक पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचेही यावेळी त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर व्हेंझी व्हिएगस व क्रूझ सिल्वा यांनी राजभवनबाहेर पत्रकारांशी बोलताना या घोटाळ्यासंबंधी सत्ताधारी सरकारशी कसा लढा द्यावा, ते ठरवण्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत सर्व विरोधक मिळून पुढील कृती आराखडा ठरवणार असल्याचे सांगितले.