बाणस्तारी अपघात : पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न व बोगस चालक दिल्याचा आरोप; न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास पथकाने बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर आणि बोगस कारचालक राजू लमाणी यांना काल दुपारी अटक केली. या अपघातातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि बोगस चालक दिल्याचा आरोप ॲड. अमित पालेकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर ॲड. अमित पालेकर यांनी फोंडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, त्यांना आणि राजू लमाणी याला अंतरिम जामीन मंजूर झाला. या अर्जावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
बाणस्तारी येथील अपघातास कारणीभूत ठरलेली मर्सिडीज कार परेश उर्फ श्रीपाद सिनाय सावर्डेकर चालवत होता; मात्र त्याला वाचवण्यासाठी कारचा चालक म्हणून राजू लमाणी याला पोलिसांसमोर आणण्याचा प्रयत्न ॲड. अमित पालेकर यांनी केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणी त्यांच्यावर पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
बाणस्तारी येथे 6 ऑगस्ट रोजी रात्री 7.30 च्या सुमारास भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघतात तिघांचा बळी गेला होता, तर, तिघे गंभीर जखमी झाले होती. पोलिसांनी या अपघात प्रकरणी परेश सावर्डेकरला अटक केली होती. त्यानंतर हल्लीच त्याची जामिनावर सुटका झाली. तसेच, मर्सिडीज कारच्या मालक मेघना सावर्डेकर हिला देखील अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. आता, आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांना अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
खांडेपारच्या ‘त्या’ पार्टीत
ॲड. अमित पालेकरही होते
पणजीतील परेश सावर्डेकर कुटुंबीय अपघात होण्यापूर्वी खांडेपार-फोंडा येथे आयोजित एका पार्टीत सहभागी झाले होते. या भीषण अपघातानंतर या पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये ॲड. अमित पालेकर दिसत होते. त्यानंतर भाजपने सदर व्हायरल फोटोच्या आधारे ॲड. अमित पालेकर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ॲड. पालेकर यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन बाणस्तारी अपघात प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा केला होता.
भाजप प्रवेशास नकार दिल्याने सूड उगवला : पालेकर
भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्याने सूडबुद्धीने आपणाला बाणस्तारी अपघात प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. आपला बाणस्तारी अपघात प्रकरणाशी काही संबंध नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मागील 2-3 दिवसापासून दबाव आणला जात होता. भाजप प्रवेश न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला होता. भाजपने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी सुडाचे राजकारण सुरू केले आहे, असा आरोपही ॲड. पालेकर यांनी केला.
चौकशीनंतर अटक
गुन्हा अन्वेषण विभागाने ॲड. पालेकर यांना चौकशीसाठी काल ताब्यात घेऊन नंतर त्यांना अटक केली. अपघातानंतर परेश सावर्डेकर याला वाचविण्यासाठी कारचालक म्हणून दुसऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर हजर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामागे ॲड. पालेकर यांचा हात होता, असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
विविध कलमांखाली गुन्हा नोंद
अपघातानंतर म्हार्दोळ पोलिसांनी परेश सावर्डेकर याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यात त्याने अतिमद्यपाशन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी परेश सावर्डेकर याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता या प्रकरणात आणखी काही कलमे जोडण्यात आली आहेत. गुन्हा विभागाने या प्रकरणाला आता भादंसंचे कलम 201, 212, 203 आणि 120 (बी) जोडले आहे. या कलमांतर्गत बोगस कारचालक राजू लमाणी याच्यासह अमित पालेकर यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली.