आत्मशक्तीतून परमानंदाची अनुभूती

0
11

योगसाधना- 607, अंतरंगयोग- 192

  • डॉ. सीताकांत घाणेकर

अनेकवेळा समाजात दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती भेटतात त्यावेळी ही साधना फार उपयोगी पडते. त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार बंद होऊन सकारात्मक विचार येतात. त्यांचे सद्गुण दिसतात. प्रत्येक साधकाने ध्यानाची ही कला आत्मसात केली तर परमानंदाची अनुभूती येईल

विश्वात प्रत्येक गोष्टीमध्ये बदल चालू आहे. फक्त आताच नाही तर अनादिकाळापासून. हा बदल आवश्यकही आहे. पण मुख्य म्हणजे कुणाच्याही नियंत्रणात नाही. सृष्टी बदलते तसा मानवही बदलतो. पण मुख्य मुद्दा म्हणजे आता हा बदल फार झपाट्याने होत आहे. काही अंशी सकारात्मक तर काही अंशी नकारात्मक.
माणसाच्या वागण्यातील बदल वयस्कांना जास्त जाणवतो. उदा. अनेक वृद्ध व्यक्ती म्हणतात, “आता आमचे नवीन पिढी ऐकत नाही. आम्हाला मान देत नाही. विचार न करता वागतात. अनेकवेळा स्वतःचा, कुटुंबाचा, इतरांचा नाश करून घेतात.” वय वाढल्यामुळे शारीरिक शक्तीबरोबर त्यांची आत्मशक्तीदेखील कमी होते. याचे एक कारण म्हणजे, तरुणपणी त्यांनी आरोग्याकडे गरजेप्रमाणे लक्ष दिले नाही. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक पैलू नव्हे. त्याबरोबर मानसिक, भावनिक, बौद्धिक व आध्यात्मिक पैलूदेखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा व्यक्तींना फार मानसिक त्रास होतो. ते दुखावले जातात. अनेकवेळा त्यांना जगण्यात रस वाटत नाही.

एक आध्यात्मिक तत्त्ववेत्ता यासाठी चांगला उपाय सुचवतो-

  1. स्वभानामध्ये जगा. अशी व्यक्ती इतरांच्या बोलण्यामुळे, व्यवहारामुळे दुखावली जात नाही. कारण त्यांना ठाऊक आहे- ‘मी’ ‘मी’ आहे, ‘तो’ ‘तो’ आहे. आपल्या संस्कारांप्रमाणे तो वागतो. तो विचार करतो, मी माझ्या सुसंस्काराप्रमाणे विचार करणार, दुसऱ्याच्या विचारांचा परिणाम माझ्यावर होऊ देणार नाही.
  2. अशा नकारात्मक घटनांकडे साक्षीभावाने बघायचे. असा विचार करायचा की ही घटना दोघांच्या पूर्वजन्मांतील संस्कारांमुळे घडते आहे. असा दृष्टिकोन ठेवला तर दुसऱ्या व्यक्तीबद्दल दया उत्पन्न होते. आपण त्यांना क्षमा करू शकतो.
  3. व्यक्ती तितक्या प्रकृती. एकाच घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. काहींना घटना अत्यंत त्रासदायक, धोकादायक वाटते. इतरांना तीच घटना साधी वाटते. इतर काहींना घटना बोधप्रद वाटते. प्रत्येकाच्या दृष्टिकोनाप्रमाणे मनावर परिणाम होतो. कुणाला चिंता वाटते, तर काही शांत असतात. काहीजण उपाय शोधण्याच्या मागे लागतात. शेवटी प्रत्येकाचे संस्कार व दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

यासंदर्भात विविध घटना रोज घडत असतात. त्यांतील एक उदाहरण बघू-

  1. आमच्या बालपणी लहान मुलांना अन्न भरवताना काऊचिऊच्या गोष्टी सांगत घरच्या महिला- आई, आजी, मावशी आपले इच्छित साध्य करत असत. आता काळ पुष्कळ बदलला आहे. हल्ली जेवताना आई ‘आय-पॅड’ ठेवते व जेवण भरवते. कारण तिचे म्हणणे असते की, त्याशिवाय मूल जेवतच नाही. दुसऱ्यांना वाटते की असे करणे बरोबर नाही. कारण मुलाच्या नाजूक मेंदूवर त्याचा परिणाम होतो.

दोघेही सांगतात, मानतात ते त्यांच्या संस्कारांप्रमाणे बरोबर आहे. कारण त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. अशावेळी बहुतेक कुटुंबांत मतभेद होतात, तंटे होतात. म्हणूनच दोन्ही व्यक्तींनी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणे अत्यावश्यक आहे. नाहीतर घरातील नाती बिघडतात. अध्यात्माच्या दृष्टीने दोघांच्या मतभेदांमुळे, स्वतःच्या नकारात्मक विचारांमुळे ती कमी होते. त्याशिवाय दुसऱ्याच्या विचारांचा नकारात्मक प्रभाव पडून शक्ती कमी होते.

  1. आजच्या युगात समाजाच्या विविध क्षेत्रांत काही नकारात्मक प्रवृत्ती आहेत. इतरांना फसवणे- जास्तकरून आर्थिक व्यवहारात अथवा आपल्या कामात यश मिळवण्यासाठी. लाच देणे, दुसऱ्या प्रतिष्ठित मोठ्या व्यक्तीचा प्रभाव वापरणे… त्यामुळे अनेकांना वाईट अनुभव येतात. त्यांची चिंता वाढते. त्यांना विविध रोग होतात- मनोदैहिक. सामान्य व्यक्ती हतबल होते. त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. अशा परिस्थितीत दोन्ही व्यक्तींना त्रास होतो. जी फसवते ती व्यक्ती व जी बळी जाते ती व्यक्ती. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाप्रमाणे दोघांचीही आत्मशक्ती कमी होते.

अनेकवेळा फसवणारी व्यक्ती लाभ मिळाल्यामुळे वरवर आनंदात असते, पण अंतर्मनात चुळबूळ चालू असते. त्यामुळे तिचेही आरोग्य बिघडते. पण सद्विचार व सत्य ज्ञात नसल्यामुळे आपले नकारात्मक व्यवहार चालू ठेवते आणि त्याचवेळी बळी जाणारी व्यक्तीदेखील आपली सुखशांती गमावते. या क्षणी दोघांनाही आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे. दुष्ट, स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञानाची खरी गरज आहे. नाहीतर तिची आत्मशक्ती कमी होते. दुष्कर्मे वाढतच जातात. इतरांचे शाप मिळतात. पुण्यकर्म कमी होते. संचित बिघडते. केव्हा केव्हा या जन्मात किंवा पुढील जन्मात फळ भोगावे लागते. कारण कर्मसिद्धांत नक्की परिणाम करतो.
अनेकवेळा या व्यक्ती इतरांनी समजावले तरी ऐकत नाहीत. त्याला एक मूळ कारण म्हणजे, त्यांचा जबरदस्त स्वार्थ व अहंकार. त्यांची ओळख असली तर सज्जनांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न अवश्य करावा, पण यश येण्याची शक्यता कमी असते.

ज्या व्यक्तीचा बळी जातो तिला दयेची गरज असते, समुपदेशाची आवश्यकता असते. तेवढेच त्यांचे दुःख कमी होते. पण त्याशिवाय त्यांना आध्यात्मिक ज्ञान देणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पैलूंनी त्यांना समजवावे लागते.

  1. कदाचित आपल्या पूर्वकर्मामुळे असे घडत असेल. कुणालाही आपले पूर्वकर्म- क्रियामाण, संचित- ठाऊक नसते, पण तसा विचार केला तर आता त्यांना सत्कर्म करायची संधी मिळते. त्यामुळे कर्माचे जुने खाते- ते काही अंशी सकारात्मक होईल व त्यांना पुढे- या जन्मात व पुढील जन्मात त्रास होणार नाही. त्याचबरोबर सद्विचार व सत्‌‍कर्मामुळे त्यांची आत्मशक्ती वाढेल. अध्यात्माच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होईल.
  2. दुसऱ्या व्यक्तीबद्दल दया ठेवून त्यांना क्षमा करावी. त्यामुळे स्वतःची आत्मशक्ती वाढते. सत्‌‍कर्म वाढते.
    अशा घटना समोर येतात तेव्हा मला येशू ख्रिस्ताची आठवण होते. क्रुसावरचे त्याचे ते शब्द आठवू लागतात-
    ‘हे देवा, यांना क्षमा कर. कारण ते काय करताहेत ते त्यांनाच माहीत नाही!’ क्रुसावर खिळ्यांनी टांगलेले असताना येशू ख्रिस्ताला शारीरिक, मानसिक व भावनिक किती वेदना झाल्या असतील याची कल्पनादेखील करवत नाही.
    फक्त अध्यात्मशक्ती उच्चकोटीची असल्यामुळे येशू असे बोलू शकले. असा विचार केला, असे ज्ञान मिळाले तर आपले अपमान अगदी सामान्य वाटतील. दया-क्षमा करायची सवय जडेल. तसे आत्मिक संस्कार सहज घडतील. कसल्याही परिस्थितीत मनःशांती लाभेल. आरोग्य व्यवस्थित राहील. शेवटी मानवी जीवनाचा हेतू हाच आहे- सुख, शांती, समाधान, आरोग्य.

अशी ही सद्विचारांची सुरुवात सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करताना केली व दिवसभर चालू ठेवली तर प्रत्येकाचा जीवनविकास सहज होईल. अनेकवेळा हा एक चांगला खेळ वाटतो. एका बाजूने मनात नकारात्मक विचार येतात व त्याचवेळी त्या विचारांना बंद करून सकारात्मक विचार करताना मजा येते. वेळ कशी निघून जाते कळतच नाही.
एक एक घटना डोळ्यांसमोर आणायची. त्यातील विविध पात्रे बघायची. त्यांची दुष्कर्मे बघायची. त्यात गुंतून जायचे नाही. त्यांना क्षमा करायची.

एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही साधना बिंदूस्वरूप आत्म्यामध्ये करायची असते; शारीरिक पातळीवर नाही. सुरुवातीला ही गोष्ट समजणे व करणे कठीण असते; पण नियमित साधना केली तर थोडे थोडे सोपे जाते.
अनेकवेळा समाजात दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती भेटतात त्यावेळी ही साधना फार उपयोगी पडते. त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार बंद होऊन सकारात्मक विचार येतात. त्यांचे सद्गुण दिसतात. प्रत्येक साधकाने ध्यानाची ही कला आत्मसात केली तर परमानंदाची अनुभूती येईल.