…आणि सावळ्या दिशांना जाईजुईची भोवळ

0
247
  • मीना समुद्र

सुगंधाची लाट उठवणारी आणि आपल्या मृदुगंधाने भोवळ आणणारी ही जाई- पाऊसथेंबासारखीच फक्त सुवासाने आपल्याला अंतर्बाह्य भिजवून चिंब चिंब करते आणि तिचं अल्लड लडिवाळ हसू हसणारं रूप आपल्याला सुगंधातून ईश्‍वरी साक्षात्कार घडवतं, आभाळधरणीचे रेशिमबंध अधिकाधिक उत्कट करतं.

श्रावणसरी कोसळत आहेत. झिम्माफुगडी घालत आहेत. आकाशातून लक्षलक्ष पाणफुले टपटपत आहेत. झाडावेलींना बोलके करीत आहेत. अंगअंग निथळणारी झाडे आणि धरणी आकाशाचा शब्द शब्द मनी साठवत आहेत. चोहीकडे दाटलेली हिरवळ आणि हिरवाई पाहून मनाचे मळे हिरवळत आहेत. पानातून हिरवा पक्षी उडतो आहे. आणि हिरवे हिरवेच काही लेवून नजर नभाला भिडते आहे. खिडकीसमोरची घराच्या कुंपणालगतची जुईच ती. हिरव्याकंच रंगामधून तिच्या इवल्या इवल्या कळ्या माना वर काढत आहेत. नाजूक देठांवर शुभ्र ज्योतीसारख्या त्या दिसत आहेत. आकाशातून मधूनच सोनेरी ऊन हसते आहे आणि त्यातून उमलून झरणार्‍या सोनकेवड्याच्या सरी थेंब आणि थेंबुटे बरसत आहेत. थेंबांची मोगरा, जाई बनली आहे आणि झुरमुर थेंबुट्यांची अतिकोमल जुई. खट्याळ उन्हाच्या गुदगुल्यांनी जाई-जुई-मोगरा खदखदून हसत आहेत. आपले डोळे विस्फारून तळहात पसरून शुभ्र सुगंधी प्रकाश सांडत आहेत. जवळून जोणार्‍या-येणार्‍याला गंधवार्ता देत आहेत. या गंधाने धुंद होऊन-
तंद्रीतच परि लयीत झुलतो आकाशाचा झुला
दिशादिशांतुन गळे जुईचा गीतगंध कोवळा
असं मन आंदोलत आहे. वेलीवर होणारी ती नाजूक नखरेल नक्षत्रफुलांची दाटी आणि तो स्वर्गीय सुगंध. या सुगंधाने, त्या सुकुमार दर्शनाने मनही प्रसन्न होऊन जाते, धुंदगंधित होऊन जाते तिथे कविमनाच्या हळवेपणाची काय कथा सांगावी?
शंकर रामाणींचं आकाशाचं मन जुईच्या कोवळ्या गंधाने, भावनांनी दाटून येतं-
शुभ्र नक्षत्रफुलांनी माझे माखले आभाळ
आणि सगळ्या दिशांना जाईजुईची भोवळ
अशा पंक्ती ते त्या धुंदीतच लिहून जातात. जाईजुईच्या सुवासाने, पावसाळ्यात घनगर्दीने सावळ्या झालेल्या दिशा स्तब्ध होतात. जणू बरसायचे विसरून जातात. किती शुभ्र सुंदर पवित्र भावना उमलून कवीच्या मनातही दाटून आल्या आहेत. नक्षत्रफुलांनी त्याचे अंतःकरण तेजस्वी कल्पनांनी माखून गेले आहे. त्या सुवासाची धुंदी, गुंगी चढल्यामुळे काहीकाळ मनही निःस्तब्ध होऊन गेलं आहे. डोळे मिटून जणू त्या गंधाचा आल्हाद ते घेत आहेत. ती धुंदी ओसरत असतानाच त्यांना वाटते-
माझिया दारात चिमण्या आल्या,
अबोल काहीसे बोलून गेल्या
कळले सारे नि कळले नाही,
मनाची अबोध हासली जुई
दाटून दिशात उतला गंध;
झडली जाणीव गळले बंध
अस्फुट भावनांनी मनात दाटी केली आहे. त्या मृदुगंधाने भोवतीचे सारे पाश आणि अस्तित्वाची जाणीव मिटून गेली आहे.
साहित्यविश्‍वात आणि त्यातून कवितेत जाईजुई अशा आपल्या अनोख्या सुगंधाने घमघमताना दिसतात. त्यांचा मोगावा घेत आपल्या वाटा गंधित होत जातात. वनदेवीचा शृंगार करण्यासाठी त्या फुलून-फुलून येताना दिसतात. त्यातून सुकुमार, नाजुक जुई ही जाईची धाकटी बहीण शोभावीशी आणि जास्त लाडाकोडाची. त्यामुळे धसमुसळ्या पावसाला इंदिराबाई आर्जवी स्वरात विनवतात-
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली
तर आषाढातील श्याममेघाबरोबर संदेश पाठवताना महाकवी कालिदास त्याला नीचैस् पर्वतावर थोडा विश्राम करून पुढे जाताना वननदीच्या तीरावर असलेल्या बागांमधल्या जाईच्या कळ्यांवर नवजलबिंदूचे सिंचन करीत पुढे जायला सांगतो. इवल्या जुईबद्दल ही काळजी नि आपुलकी त्याच्याही मनात.
आणि कवी अनिल तर जुईवर अख्खी कविताच लिहितात-
पावसाची सर ओसरून जाताना इवल्या इवल्या फुलांनी भरलेल्या अंगावर निथळणार्‍या जुईभोवती काही तुषार उगीच भिरभिरत राहतात. जुईचा कोमल सुगंध त्यात विरघळतो आणि ओल्या झुळुकीत तो भरून वारा नेत असतो. अशावेळीच तलम ढगांच्या सात घड्यातून सौम्य गाळीव चांदणं पडावं तसं जाळीच्या पडद्याआडून जुईचं नितळ रूप आतिशय देखणं दिसतं. जुईचा बांधा लवचिक, कोवळ्या फांद्यांचा. जुई तो पाचूच्या पानांनी झाकून घेते. तिची शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेवून अधिकच सुंदर दिसते. मादकता मार्दवतेत विरून जाऊन सोज्वळाआड सौंदर्य दडते. जुईच्या या लावण्याला, रूपगंधाला ‘जागेपणी जिवाला पडलेलं सोलीव सुखाचं स्वप्न’ असं ‘जुई’चं भावपूर्ण वर्णन कवी अनिलांनी केलं आहे.
कविवर्य मंगेश पाडगावकरांनीही- ‘हात हवे मज नाजुक सुंदर, जुइपुष्पांपरि ज्यांचे मार्दव’ अशीच इच्छा केली आहे.

जुईच्या गंधवेणांनी घायाळ कवी किशोर पाठकही एका गझलेत लिहितात-
कितिक उरा शपथविले जायचे कधी न पुन्हा
दारातिल धुंद जुई केसातुन सलते रे…
समईच्या शुभ्रदीपकळ्या उमलून याव्यात तशा जाईच्या अतिनाजूक अष्टदलांच्या (आठ पाकळ्यांच्या) या कुसुमकोमल कळ्या शुभ्र, सतेज, गंध उलगडतात तेव्हा पद्मा गोळे यांना ही सृष्टी, ही धरणी आपल्या हसर्‍या डोळ्यात आकाशाची निळाई घेऊन काळ्या केसांत आणि श्‍वासात दरवळणार्‍या जाईजुईमुळे ‘स्वप्नमयी’ वाटते. फुलांच्या गंधकोशातून हसणारा श्रावण कसा सुखद झाला आहे. मन उजळीत चालला आहे. त्यामुळे-
आज कितीक दिसांनी जुई माळली केसात
मन भारावून वसे तिच्या सुगंधी कोषात
अशी त्यांची अवस्था झाली आहे. जुई अशीच नाजुक नखर्‍याने, मृदुगंधाने दंगविणारी, गुंगविणारी.
गर्द हिरवा चुडा हाती पहिली माहेराची खेप
जाईजुईच्या संगती राती अवघडे झोप
असाही अनुभव त्या वर्णन करतात. कधी मध्यरात्री वारा अचानक थांबतो आणि जाईजुईची लाजरी कुजबूज बंद होते आणि डोळ्यात झोप दाटून येते.

जुईची अशी ही अतिसुकुमार चांदणचिटकी फुलं तोडून (हा शब्दही फार कठोर वाटतो)- नव्हे अलवार हातांनी खुडून नाजुक सुईदोर्‍यात गुंफून त्यांचा गजरा बनवून केसात माळला की अवघं भोवताल परिमळतं. ओंजळभर फुलं नव्हेत तर अगदी चारच फुलं हाती घेऊन हुंगली तरी तो गंध आणखी आणखी खोल श्‍वासात भरून घ्यावासा वाटतो. सुगंधाची लाट उठवणारी आणि आपल्या मृदुगंधाने भोवळ आणणारी ही जाई- पाऊसथेंबासारखीच फक्त सुवासाने आपल्याला अंतर्बाह्य भिजवून चिंब चिंब करते आणि तिचं अल्लड लडिवाळ हसू हसणारं रूप आपल्याला सुगंधातून ईश्‍वरी साक्षात्कार घडवतं, आभाळधरणीचे रेशिमबंध अधिकाधिक उत्कट करतं.