आज चांद्रभेट

0
34

आज इतिहास घडणार आहे. भारताचे चंद्रयान संध्याकाळी ठीक सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरणार आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणतात. भारताच्या मागील चांद्रमोहिमेच्या अंतिम टप्प्यातील अपयशाने खचून न जाता ‘इस्रो’च्या हजारो शास्त्रज्ञांनी गेली चार वर्षे घाम गाळून आजचा हा मंगलक्षण आणला आहे. चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडले त्याला खरे तर कैक दशके लोटली. तेव्हाच्या तुलनेत आज विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे प्रगत झालेले आहे, तरी देखील मनुष्यरहित चांद्रमोहिमा सुद्धा एवढ्या आव्हानात्मक का, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तब्बल 47 वर्षांनी चंद्राकडे निघालेले रशियाचे लुना – 25 यान चंद्राच्या परिभ्रमणकक्षेत प्रवेश करण्याआधीच भरकटले आणि थेट चंद्रावर आदळून नष्ट झाले ही घटना तर ताजीच आहे. गेल्या चार वर्षांत भारत, इस्रायल, जपान आणि रशियाच्या चार चांद्रमोहिमा अपयशी ठरल्या. गेल्या काही वर्षांत चीन वगळता अन्य कोणत्याही देशाचे यान चंद्रावर यशस्वीरीतीने उतरू शकलेले नाही, भले मग विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालेले का असेना. अमेरिकेने जेव्हा चंद्रावर मानव उतरवला, तो काळ वेगळा होता. एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया अशा दोन महासत्तांमधील शीतयुद्धाचा तो काळ होता. त्यांची एकमेकांशी पराकोटीची स्पर्धा होती. त्यामुळे सर्व शक्ती पणाला लावून महाचढाओढीने ह्या अवकाश मोहिमा राबवल्या जात होत्या. चंद्रावर मानव उतरवण्यात अमेरिका तेव्हा यशस्वी झाली, परंतु तेव्हा देखील चांद्र मोहिमांच्या यशस्विततेचे प्रमाण जेमतेम पन्नास टक्केच होते. तीव्र सत्तास्पर्धेपोटी केवढा विलक्षण धोका तेव्हा पत्करला गेला होता हे त्यावरून लक्षात यावे. आजच्या काळात राबवल्या जाणाऱ्या मोहिमा मात्र सुरक्षितता, किफायतशीरता आणि इंधनाची बचत अशा सर्व दृष्टींचा विचार करून राबवल्या जात असतात. भारताची चांद्रमोहीम हॉलिवूडपटापेक्षाही कमी खर्चात राबवली जाते त्याचा अर्थ हाच आहे. खरे तर भारताने आपली पहिली पावले ह्या क्षेत्रात टाकली तीच मुळी रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेचा हात धरून. परंतु एकेकाळची बलाढ्य रशिया 1991 मधील विघटनानंतर अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात कुठल्या कुठे फेकली गेली. खुद्द अमेरिकेलादेखील मध्यंतरी घडलेल्या काही भीषण दुर्घटनांनंतर आपल्या मोहिमा आवरत्या घ्याव्या लागल्या. आज ‘नासा’ला एलॉन मस्कच्या ‘स्पेस एक्स’सारख्या व्यावसायिक उपक्रमाशी हातमिळवणी करावी लागली आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने ह्या क्षेत्रात घेतलेली झेप खरोखरच अजोड स्वरूपाची आहे. अवकाश संशोधनात एकेकाळी आघाडीवर असलेल्या रशियासारख्या देशाला आज चाचपडावे लागते आहे यातून चांद्रमोहिमांतील गुंतागुंत लक्षात यायला हरकत नसावी. आपल्यानंतर यान सोडून अवघ्या सहा दिवसांत चंद्राजवळ पोहोचून आपल्याआधी ते उतरवण्याचा त्यांचा बेत फसला म्हणून आपण आनंद मानायचे काही कारण नाही. शेवटी अवकाश संशोधन मोहिमांतून हाती येणारे वैज्ञानिक ज्ञान अखिल मानवजातीच्या भल्यासाठी असते. आपल्या चंद्रयान 2 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागाखाली बर्फ असल्याचा शोध लावला होता. त्याचे लँडर जरी तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अपयशी ठरले, तरी त्याचा ऑर्बिटर आजही आपले काम करतो आहे. परवा त्याने चंद्रयान 3 च्या लँडरला ‘स्वागत, मित्रा!’ असा संदेश पाठवला ती भेट तर ऐतिहासिक स्वरूपाची होती. भारताच्या तांत्रिक, वैज्ञानिक प्रगतीचा तो दाखला होता. आज चंद्रयान जेव्हा दिलेल्या वेळेबरहुकूम चंद्रावर अलगद उतरेल तेव्हा प्रत्येक भारतीयासाठी तो निश्चित अभिमानास्पद क्षण असेल. चंद्रयान 2 च्या वेळी इस्रोचे तत्कालीन प्रमुख के. सिवन यांनी शेवटच्या पंधरा मिनिटांतील दहशतीचा उल्लेख केला होता. त्या मोहिमेत घडलेल्या तांत्रिक चुकांचा गेली चार वर्षे अत्यंत सखोल अभ्यास करून, त्या त्रुटी दूर करून ही मोहीम आखलेली आहे आणि त्यामुळे ती यशस्वी होईल असा जबर विश्वास आपल्या शास्त्रज्ञांना आहे. खरोखरच गेल्या महिन्यात झालेल्या उड्डाणापासून आजवरचा ह्या यानाचा प्रवास अगदी पूर्वनियोजनाबरहुकूम झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला श्वास रोखून धरायला लावणाऱ्या ह्या शेवटच्या काही क्षणांच्या प्रवासामध्येही सगळे सुरळीत पार पडेल व आपले ‘विक्रम’ चंद्रावर यशस्वी अवरोहण करील हा दृढ विश्वास व्यक्त करायला हरकत नसावी. ह्या मोहिमेच्या सफलतेनंतर भारत चंद्रावर यान उतरवणाऱ्या अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांच्या पंक्तीत मानाने जाऊन बसणार आहे. आपल्या प्रत्येकाची मान अभिमानाने उंचवणारे हे यश असेल हे निःसंशय!