- – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
‘आई’ या शब्दात दोन अक्षरे आहेत. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचा संगम येथे झाला आहे. आज मराठी संस्कृतीतील हिंदू कुटुंबांत ‘आई’ म्हणणे म्हणजे नवीन पिढीला लाजिरवाणे वाटते; आणि तिची जागा मम्मी, मॉम, मॉं अशा शब्दांनी घेतली.
‘आई’ या शब्दात दोन अक्षरे आहेत. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचा संगम येथे झाला आहे. आज मराठी संस्कृतीतील हिंदू कुटुंबांत ‘आई’ म्हणणे म्हणजे नवीन पिढीला लाजिरवाणे वाटते; आणि तिची जागा मम्मी, मॉम, मॉं अशा नवीन शब्दांनी घेतली आहे.
मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात संपूर्ण जगात ‘मदर्स-डे’ साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत वर्षाच्या ३६५ दिवसांतील प्रत्येक दिवस हा ‘मदर्स-डे’च असतो. तैत्तरीय उपनिषदातील ‘मातृदेवो भव’ हे आपले ब्रीदवाक्य आहे. आईला देवाच्या जागी पुजणे हे आपल्या धर्माचे बोधतत्त्व आहे.
आई मुलाचा नऊ महिने आपल्या उदरात सांभाळ करते. जन्मल्यानंतर त्याचे लालन-पालन व संगोपन करते. दुग्धपान हे आईनेच मुलाला करायचे असते. आपल्या दुधातूनच ती बाळाला संस्कार देते. जणू अमृतच पाजत असते. नीतिमूल्ये आई जितकी हळुवारपणे शिकवू शकते तितके कसब आणि कौशल्य दुसर्या कोणालाही शक्य नाही.
रांगणारे बाळ कुठे पडणार तर नाही ना? त्याला खरचटणार तर नाही ना? दुडुदुडु धावताना कुठे घसरून तर पडणार नाही ना? यावर आईची नजर एकसारखी भिरभिरत असते.
आचार्य अत्र्यांची जेव्हा आई वारली तेव्हा त्यांनी म्हटले, ‘‘आई असताना आईची किंमत कळत नाही आणि आई गेल्यावर जीवनात काहीच नाही.’’ ‘स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी!’ माणूस कितीही यशाच्या शिखरावर पोहोचला तरी आपले यश पाहायला आई जिवंत असायला हवी होती असे त्याला मनापासून वाटायला लागते.
आईचे निधन झाल्यावर मुलाच्या हृदयातील एक कप्पा पोरका होतो. आईची आठवण त्याला पदोपदी येत राहते. ही पोकळी कधीच भरून येत नाही. मनातील आईसाठीची रिकामी जागा नेहमीच खंत निर्माण करत असते.
मूल आजारी असताना रात्रीच्या रात्री जागरण करून आई लहान मुलाची शुश्रूषा करते. त्याला औषध पाजणे, पाणी पाजणे, सर्वांगाला मालीश करणे, तेल लावणे, आंघोळ घालणे, एक नाही तर हजार सेवेची कामे ती अखंडपणे करतच राहते. आपण स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर जेवायला घातलेल्या आयांची कित्येक उदाहरणे आपल्या निरीक्षणात आली आहेत. गरीब आई परिस्थितीशी स्वतः टक्कर देत मुलांना सांभाळते. तळपत्या उन्हात स्वतः तडफडते पण मुलांना सावलीत ठेवते.
जिजाबाईंनी लहानग्या शिवबाला रामायण-महाभारतातल्या गोष्टी सांगून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी घडवले.
डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या आईने स्वतः कष्टाची कामे करून एक महान वैज्ञानिक भारतमातेसाठी निर्माण केला. साने गुरुजींच्या आईने लहानग्या श्यामवर संस्कार करून महाराष्ट्राला एक आदर्श शिक्षक दिला. ‘पायाच्या तळव्याला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस तर मनालाही घाण लागू नये याची काळजी घे!’ श्यामच्या आईच्या शब्दांमध्ये सगळ्या उपदेशाचा सारांश भरलेला आहे. मुलांचा नैतिक पिंड घडवणार्या अशा मातांची आज देशाला खरी गरज आहे.
आपल्या आईविषयी सांगताना प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन म्हणतात की, आईने आपल्याला धाडसी, लढाऊ आणि जिद्दी बनवले. प्रत्येक अपयशाच्या वेळी आपल्याला सावरले आणि पुढे जाण्याचा अचूक मार्ग दाखवला.
कुंभार आपल्या चाकावर जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो, तशी आई आपल्या मुलाच्या मनात संस्कारांना आकार देते. ‘मदर्स इज फर्स्ट युनिव्हर्सिटी’ हे वाक्य त्याचसाठी म्हटले गेले आहे.
जागतिक ‘मदर्स-डे’ची सुरुवात चमत्कारिक पद्धतीने झाली आहे. अमेरिकेतील ऍना जार्विस या समाजसेविकेने लग्न केले नव्हते. केवळ आई हेच तिचे सर्वस्व होते. वयोमानानुसार एके दिवशी आईचे निधन झाले. मृत्यूनंतर तिच्या आठवणीसाठी ‘मदर्स-डे’ची सुरुवात ऍनाने केली. ९ मे १९१४ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याच्या दुसर्या रविवारी ‘मदर्स-डे’ साजरा करण्याचा कायदाच केला. मग अमेरिकेतून हा दिवस सगळ्या जगभर पसरला.
आई फक्त माणसांचीच नाही, तर सगळ्याच प्राण्यांची आई महान आहे. गाईचे वासरावरील वात्सल्य बघा, मांजरीचे तिच्या पिल्लांवरील प्रेम बघा, कांगारू आपल्या कोकराला कसे आपल्या पोटातील पिशवीत सांभाळते ती ममता बघा, वानरीचे पिल्लू कसे तिच्या पोटाला कवटाळून राहते ती आत्मीयता बघा.
‘लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त
ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती’
असे संत तुकाराम महाराज म्हणतात ते आईचे विश्वात्मक श्रेष्ठत्व स्पष्ट करण्यासाठीच. आईच्या त्यागाला दुसरी उपमाच नाही. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ हे आईसाठीच आहे. खरोखरच, आईसारखे या जगात दुसरे दैवतच नाही.