आंबोलीत पर्यटकांची झुंबड, ४ तास चक्काजाम

0
16

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत काल रविवारची संधी साधत पर्यटकांनी हाऊसफुल गर्दी केली होती. आंबोलीच्या प्रमुख धबधब्यासह इतर स्थळांचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी गेल्याने आंबोलीचा प्रमुख रस्त्यावर तब्बल ४ तास वाहतूक खोळंबली होती. दुपारी १२ ची एसटी प्रवासी बस सावंतवाडीतून आंबोलीत ६ वाजता पोचली. वाहतूक खोळंबल्याने वेंगुर्ला – बेळगाव रस्त्यावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांनीही नाराजी व्यक्त केली.

आंबोलीत काल रविवारच्या दिवशी नियोजन बिघडल्याचे चित्र होते. घाटात तब्बल ४ तास वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले होते. बरेचसे पर्यटक गाड्या रस्त्यालगत लावून पर्यटनासाठी गेल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. एसटी बस तब्बल ४ तास उशिरा पोचली. सर्वच पर्यटन स्थळावर मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शनिवारी सर्व राहण्याची हॉटेल्स फुल्ल होती. त्यामुळे रविवारी मोठी गर्दी होती. आंबोलीच्या रस्त्यावर गाड्या देखील मोठ्या प्रमाणात होत्या. कर्नाटक, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, कोकण, सांगली आदी सर्व भागातून पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे अनेकांची गैरसोय झाल्याने बरेचजण नाराज होते.