आंतरराष्ट्रीय पर्यावरण सक्षमता परिषदेचे आज बांबोळी येथे उद्घाटन

0
10

बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दि. 2 ते 4 फेब्रुवारीपर्यंत पहिली आंतरराष्ट्रीय पर्यावरण सक्षमता परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन आज दि. 2 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते होणार आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीआयआय, नेरी व सीएसआयआर यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान, 4 फेब्रुवारी रोजी जागतिक वेटलँड दिन साजरा करण्यात येणार असून यावेळी वेटलँड वाचवा मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार
आहे.

उद्घाटन समारंभाला खासदार सुरेश प्रभू, पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल व प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहतील. यावेळी सुरेश प्रभू यांचे बीजभाषण होणार आहे. शाश्वत भविष्याची उभारणी हा या परिषदेचा उद्देश आहे. परिसंवाद व प्रदर्शनाद्वारे शाश्वत पर्यायांना व्यासपीठ देण्याचे कार्य या तीन दिवसीय परिषदेत करण्यात येणार आहे. औद्योगिक कंपन्या, मंत्रालय, सरकारी खाती, शैक्षणिक संस्था व इतर संस्था या परिषदेत सहभागी होतील. परिषदेला नेरी, आयआयटी मुंबई, स्कोडा ऑटो वॉक्सवेगन, बिर्ला फॅशन, रिलायन्स इंडस्ट्री, गोदरेज व इतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वक्ते उपस्थित राहतील.

समारोप 4 फेब्रुवारीला
परिषदेचा समारोप 4 फेब्रुवारी रोजी दु. 2.30 ते सायं. 4 या दरम्यान होईल. यावेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री नीलेश काब्राल, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित राहतील. याशिवाय दि. 4 रोजी पाणथळ वाचवा मोहिमेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, डॉ. प्रमोद सावंत, नीलेश काब्राल, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या उपस्थितीत रवींद्र भवन कुडचडे येथे करण्यात येणार आहे. दरम्यान, 3 फेब्रुवारी रोजी फॉर्च्युन हॉटेल येथे विभागीय स्तरावर पाणथळांचे संवर्धन या विषयावर कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत 23 राज्यातील 75 वेटलँड व्यवस्थापकांची उपस्थिती लाभणार आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत 200 प्रतिनिधींनी नोंदणी केली असून 100 भारतीय कंपन्या सहभागी होतील. याशिवाय प्रदर्शनात 50 कंपन्या सहभागी होणार असून 60 ते 70 वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमुळे गोमंतकीय उद्योजकांसाठी महत्त्वाची संधी असेल. या परिषदेत विद्यार्थी वर्गही सहभागी होऊ शकतात.