>> कोविड -१९ ः केंद्रीयगृह मंत्रालयाचे निवेदन
अमहदाबाद, सूरत, हैदराबाद व चेन्नई या शहरांमधील कोविड-१९ ची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे अधिकृत निवेदन काल केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले. तसेच लॉकडाऊन नियमांचे देशातील अनेक भागांमध्ये उल्लंघन झाल्याचे अहवाल मिळाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी ती बाब गंभीर धोक्याची असून कोविड-१९ चा अधिक फैलाव होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
विशेषतः प्रमुख कोविड हॉटस्पॉट म्हणून नव्याने प्रकाशात आलेल्या जिल्ह्यांपैकी प्रामुख्याने अहमदाबाद, सुरत (गुजरात), ठाणे (महाराष्ट्र), हैदराबाद (तेलंगण) व चेन्नई (तामिळनाडू) या जिल्ह्यांमधील स्थिती गंभीर आहे असे निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने याआधीच देशातील कोविड -१९ हॉटस्पॉट जिल्ह्यांमधील प्रत्यक्ष पाहणीसाठी १० आंतरमंत्रिय केंद्रीय पथके तयार केली आहेत. यापैकी ५ पथके अहमदाबाद, सूरत, ठाणे, हैदराबाद व चेन्नई येथे पाहणीसाठी तेथे रवाना झाली आहेत. त्या आधी मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर व कोलवाळ येथे अशी पथके याआधीच गेली आहेत.
देशाताल विविध ठिकाणी लॉकडाऊन उल्लंघनाची गंभीर प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यात प्रामुख्याने डॉक्टर, परिचारिका व अन्य आरोग्य कर्मचार्यांवरील हल्ले ही गंभीर प्रकरणे ठरली आहेत. याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ दिल्यास कोविड हॉटस्पॉट जिल्ह्यांमधील लोकांच्या आरोग्याला कोरोना फैलावाचा मोठा गंभीर धोका उद्भवू शकतो असे मंत्रालयाने नमूद केले आहे. या अनुषंगाने पाहणी करुन संबंधित राज्यांच्या अधिकार्यांना आवश्यक मार्गदर्शनापर निर्देश दिले जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.