असानी चक्रीवादळाचा कहर

0
21

>> ओडिशात ६ मच्छीमारी बोटी बुडाल्या

आंध्र प्रदेशमध्ये असानी चक्रीवादळाचा कहर झाला असून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ओडिशामध्ये ६ मच्छीमारी बोटी बुडाल्या. यात असलेल्या सर्व मच्छीमारांना वाचवण्यात यश आले आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत इंडिगोने विशाखापट्टणम विमानतळावर येणारी आणि जाणारी तब्बल २३ उड्डाणे रद्द केली आहेत. ओडिशा व आंध्र प्रदेश सरकारने असानीबाबत हाय अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे समुद्रातील हालचाली तीव्र होत असून मच्छिमारांना काही दिवस किनार्‍यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

६ बोटी बुडाल्या
असानी चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. काल सकाळी ६० मच्छिमार ओडिशातील ६ बोटींमधून समुद्रातून परतत असताना झालेल्या अपघातात सर्व बोटी एकामागून एक उलटल्या. मात्र, वेळीच सर्व मच्छिमारांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्येही या वादळाने कहर केला आहे. यामुळे कोलकात्यात मुसळधार पाऊस पडत असून लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.