गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना या अर्थसंकल्पात उल्लेखनीय असे काहीच नसल्याचे मत मांडले. मागच्या अर्थसंकल्पातील काही योजनांची पुन्हा घोषणा करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची 25 टक्के एवढीच अंमलबजावणी झाल्याचे ते म्हणाले. यावरून फक्त घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात अर्थसंकल्पातील योजनांची अंमलबजावणी मात्र खूपच कमी होते, असे ते म्हणाले. गोव्याच्या एकूण सकळ उत्पादनात दाखवलेली वाढ ही खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे ते म्हणाले. राज्यात कन्स्ट्रक्शन (बांधणी) व हॉटेल हे दोन व्यवसाय सोडल्यास अन्य व्यवसायात एका प्रकारची मंदीच असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राज्याचे एकूण सकळ उत्पन्न हे 10 टक्क्यांनी वाढले असे जे सांगण्यात आले आहे ते खोटे असल्याचे सरदेसाई म्हणाले. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नानातसुद्धा एवढी वाढ झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात बँकिंग क्षेत्र तर खूपच मागे पडले असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. मनोहरराय सरदेसाई व रवींद्र केळेकर यांचा जन्मशताद्बी कार्यक्रम आयोजित करण्याच्या निर्णयाचे मात्र त्यांनी स्वागत केले. त्याचबरोबर मडगाव येथील घाऊक मार्केटच्या इमारतीच्या बांधकामाच्या निर्णयाविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले.