अर्थव्यवस्थेला उभारीसाठी पंतप्रधानांना विनंती

0
193

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोव्यातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी खनिज उद्योग आणि पर्यटन व्यवसायाला चालना देण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर बोलताना काल दिली. लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यताही सावंत यांनी व्यक्त केली.

या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, मुख्य सचिव परिमल राय, वित्त सचिव दौलत हवालदार, आरोग्य सचिव नीला मोहनन व इतर अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांच्यासमोर राज्यातील कोविड १९ च्या परिस्थितीचा आढावा सादर केला. तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाबद्दलचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. राज्याच्या महसुलाचे स्रोत कमी झाल्याने निर्माण झालेल्या आर्थिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्यातील बंद असलेला खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची गरज असून केंद्राने आर्थिक पुनरुज्जीवनासाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंतरराज्य सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध थोडे शिथिल करण्यावर विचार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्यानंतर राज्यांना यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मिळणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यावर भर द्या : मोदी

विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी काल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुसंवाद साधताना कोविड-१९चा प्रसार कसा कमी करता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक अंतर राखण्यासह अन्य नियमांच्या पालनाबाबत सर्वतोपरी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही आपली मते मांडली व सूचना केल्या.

यावेळी पंतप्रधान मोदी यानी सांगितले की हळुहळू आणि त्याचवेळी ठामपणे देशाच्या विविध भागांमध्ये आर्थिक घडामोडी सुरू झाल्या आहेत. येणार्‍या काळात आर्थिक गोष्टींना आणखी गती मिळेल. आम्हाला एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल की यापुढे कोविड-१९ विरोधी लढ्यावरच आमचे लक्ष केंद्रीत करावे लागले असे ते म्हणाले.
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच या सुसंवादात राजनाथ सिंग, अमित शहा, निर्मला सीतारमण, हर्षवर्धन या केंद्रीय मंत्र्यांनीही भाग घेतला. याआधीच्या अशा कार्यक्रमात फक्त काही निवडक मुख्यमंत्र्यांची निवड बोलण्यासाठी केली होती. मात्र यावेळी सर्व मुख्यमंत्र्यांना ती संधी देण्यात आली. यावेळी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विशेष रेलगाड्या सुरू करण्यात विरोध व्यक्त केला.

संकटकाळात केंद्र सरकारने
राजकारण करू नये : ममता
केंद्र सरकारने कोरोना महामारीसारख्या संकटकाळात राजकारण करणे थांबवावे असे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजिलेल्या पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुसंवादा दरम्यान सुनावले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी पंतप्रधानांना केली. त्या म्हणाल्या, ‘आम्ही सरकारला सहकार्य देत होतो. परंतु तुम्ही राजकारण कशाला खेळता? राजकारण करण्याची ही वेळ नाही. आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत? लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेण्याआधी राज्य सरकारांचीही मते विचारात घेण्याची सूचना त्यांनी केली.

प्रवासी विमाने, रेलगाड्यांना
तामिळनाडूकडून विरोध
तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानी स्वामी यांनीही रेलसेवा सुरू करण्यास विरोध केला. पंतप्रधानांना त्यांनी विनंती केली की ३१ मे पर्यंत तामिळनाडूत प्रवासी रेलगाडी पाठवण्यात येऊ नये. तामिळनाडूतील कोविड-१९ प्रकरणे ७००० वर गेली असल्याने येथील विमान वाहतुकही सुरू करु नये अशी विनंती त्यांनी केली. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी यांनी मोदी याना आवाहन केले की प्रत्येक राज्याला लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करण्याचे अधिकार देण्यात यावेत. संबंधित राज्यांमधील परिस्थितीनुरुप तसे करण्यास द्यावे असे ते म्हणाले.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी राज्यांमधील आर्थिक विषयांवर निर्णय घेण्याचे राज्य सरकारांना अधिकार देण्याची विनंती केली.

लॉकडाऊन वाढवा : अमरिंदर
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्याची सूचना केली.