अर्थव्यवस्था थांबता नये ः मोदी

0
11

>> ३० मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करतानाच अर्थव्यवस्था थांबणार नाही यावरही लक्ष केंद्रीत करण्याची सूचना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना त्यांनी सूचना केली. यावेळी पंतप्रधानांनी या राज्यांतील कोरोना स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मोदी यांनी, राज्यांत लॉकडाऊन लागणार नाही, याची काळजी घ्या असा सल्ला दिला. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अतिशय वेगाने लसीकरण सुरु आहे. लसीकरण वेगाने होत असतानाही कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्यामुळे काही जण लसीकरण तसेच मास्कबाबत भ्रम पसरवत आहेत. अशा अफवांना उत्तर देण्याची खूप गरज आहे. अशाप्रकारचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केले. तसेच राज्यातील कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे. यावेळी मोदी म्हणाले की, केंद्राने राज्यांना २३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्याचा अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांसाठी वापर केला.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेकांचे नुकसान झाले. नोकर्‍या गेल्या, अर्थचक्र रखडले. आता पुढील काळात अर्थचक्र रखडू नये, यासाठी प्रयत्न करायचा असल्याचे मोदींनी सांगितले.