अमित शहांचे ‘ते’ विधान खरेच : गिरीश चोडणकर

0
13

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथील राजकीय सभेत म्हादईसंबंधी केलेले वक्तव्य हे खोटे नसून, कर्नाटकच्या म्हादईसंबंधीच्या डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी देण्यापूर्वीच केंद्र सरकारने कर्नाटक व गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन म्हादईप्रश्नी तोडगा काढला असावा, हे शहा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवण्यास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्यता दिली होती हे अमित शहांचे विधान खोटे असल्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल व जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हे सांगत असले तरी ते विधान खरे आहे, असे चोडणकर म्हणाले.

कर्नाटकच्या डीपीआरला मान्यता मिळाल्यानंतर अमित शहा यांना भेटायला गेलेल्या गोवा सरकारच्या शिष्टमंडळाकडे कर्नाटकला पाणी वळवू देण्यासंबंधीची कोणतीही चर्चा झाली नव्हती असा जो दावा काब्राल व शिरोडकर हे करीत आहेत त्याविषयी बोलताना चोडणकर म्हणाले की, अमित शहा यांनी त्या भेटीत ही चर्चा झाल्याचे म्हटलेच नसून, ही चर्चा कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी मिळण्यापूर्वीच केंद्र सरकारने गोवा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जी बैठक घडवून आणली होती, त्या बैठकीत ही चर्चा झाल्याचा दावा चोडणकर यांनी केला.
केंद्राने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची गुप्तपणे बैठक घडवून आणल्याचा व त्या बैठकीत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या दबावाखाली म्हादईचे पाणी वळवण्यास मान्यता दिल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.