अमली पदार्थ आणि मुलांचा सहभाग

0
1384
  • देवेश कु. कडकडे
    (डिचोली)

जगात आज दीड कोटी लोक अंमली पदार्थांचे सेवन करतात. भारतातील ३५ लाख लोक या व्यसनाच्या आहारी गेले असून त्यातील २० टक्के अल्पवयीन म्हणजे १८ वर्षाखालील आहे. भारतात दरवर्षी सुमारे अडीच हजार व्यक्ती ज्या या व्यसनात अडकल्या आहेत, त्या आत्महत्या करतात.

एखादे चांगले व्यसन माणसाला प्रगतीकडे घेऊन जाते, तर वाईट व्यसन अधोगतीला नेते. प्रथम मजा म्हणून, नंतर मित्रांबरोबर केलेल्या अंमली पदार्थाच्या सेवनाचे भविष्यात व्यसनांत रूपांतर होते. हे व्यसन सुटत नाही तेव्हा परिस्थिती कठीण बनते. दारू पिणे, गुटखा खाणे इथपर्यंत मर्यादित असलेले व्यसन जेव्हा अंमली पदार्थापर्यंत मोठ्यांपासून अल्पवयीन मुलांपर्यंत पोचले तेव्हा सर्वच देशासाठी हा काळजीचा विषय बनला, कारण मुले केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर देशासाठीही महत्त्वाची असतात. त्यामुळे व्यसन हे देशासाठी नुकसानकारक असते.

समाजात अंमली पदार्थाची विक्री होत नाही असे एखाद्या राज्यकर्त्या म्हणणे ही अंधश्रद्धा आहे. ऑस्ट्रेलियन लेखक ग्रेगरी डेव्हीड रॉबटर्‌‌स यानी आपला ‘शांताराम’ हा ग्रंथ मुंबईतील काही वर्षांच्या अनुभवावर लिहिला आहे. यात त्यांनी अंमली पदार्थांची विक्री, सेवन या संबंधी खुलेपणाने लिहिले आहे. एकेकाळी सोन्याच्या तस्करीचा व्यवसाय जोरात होता. आता त्याची जागा अंमली पदार्थाने घेतली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दळणवळणाची साधने वाढल्यामुळे जगात विविध प्रकारच्या मादक पदार्थांचा व्यवसाय अनियंत्रित वाढला. सध्या भारताएवढी मोठी बाजारपेठ अन्य देशात नसल्यामुळे सर्व व्यावसायिकांची प्रथम धाव ही भारताची बाजारपेठ काबीज करण्याकडे असते.

ब्रिटीश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आले ते मसाल्यासाठी असे सांगितले जाते, मात्र यातील मुख्य मसाला खसखस आहे. यातील पोपिन वनस्पतीतून गर्द बनवला जातो आणि ब्रिटिशांना त्या वनस्पतीची ताकद माहीत होती, तसेच ब्रिटिशांनी भारतात अफू पिकवण्यास सुरूवात केली आणि त्याची निर्यात चीन देशात केली. चीनच्या राजाच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा त्याने हा सर्व माल नष्ट केला, तो दिवस होता २६ जून १८३९. म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाची अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून निवड केली आहे, कारण या व्यवसायाच्या वाढत्या स्वरुपाने सर्व देशाच्या नाकापर्यंत पाणी आणले आहे. ते त्यांच्या भवितव्यावर घाला घालणारे आहे. असे म्हणतात, तुम्हाला एखाद्या देशाविरुद्ध युद्ध जिंकायचे असेल तर त्या देशातील तरुणांना अंमली पदार्थाचा व्यसनात लोटून द्या. सारा देश तुमच्या ताब्यात येईल.

काही वर्षापूर्वी मुले मर्दानी खेळ खेळत असल्याने ताणतणावापासून दूर असत आणि त्यांचे मन स्थिर आणि शांत असायचे. आता मुले सतत अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली असतात. टीव्ही, मोबाईल यात मग्न असल्याने मुलांची मने संभ्रमित बनली आहेत, त्यामुळे त्याचे मानसिक, भावनिक आणि बौद्धिक श्रम वाढत आहेत. अशावेळी काहीजण अंमली पदार्थांचा आधार घेतात. अंमली पदर्थाचे सेवन करणार्‍या बहुतेक लोकांना याचे व्यसन अल्पवयीन काळात जडलेले असते. हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. याच काळात कोणत्याही व्यसनाचा नाद घट्ट आवळला जातो.

अल्पवयीन मुले मादक पदार्थाचे सेवन करण्यामागे अनेक कारणे असतात. जी गोष्ट वडीलधारे करतात त्यांचे अनुकरण करणे, नवनवीन गोष्टींचे आकर्षण वाढून त्याचा उपयोग करण्याची वृत्ती निर्माण होणे. यावेळी आपण काय करतो यांचे त्याना भानही नसते. मुळात या गोष्टी अज्ञानातच होतात. त्यामुळे हा व्यवसाय करणार्‍यांचे प्रमुख लक्ष ही अल्पवयीन मुले असल्याने त्यांना यात अडकवण्यासाठी विविध सापळे रचले जातात. शाळा, कॉलेज यांच्या आजुबाजूला जे फेरीवाले, गाडेवाले असतात, ते मुलांना अनेक खाद्यपदार्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात अंमली पदार्थाची चटक लावू शकतात, उदा. पान, सिगारेट, बिस्किट यात किंचित प्रमाणात मादक पदार्थ मिसळले जातात. याचा परिणाम शेवटी ही मुले मूळ अंमली पदार्थाकडे वळतात.

आजच्या आधुनिक काळात एक किंवा दोन मुले या संकल्पनेमुळे पालक आपल्या मुलांच्या पालन पोषणा संबंधी खूपच संवेदनशील असतात. वाढत्या स्पर्धेमुळे आपली मुले मागे राहू नयेत म्हणून त्यांच्या राहणीमानावर, शिक्षणावर अनिर्बंधपणे खर्च करतात. जे सुख आपल्याला मिळाले नाही, ते सुख आपल्या मुलांना मिळू देत ही भावना सर्वच पालकांमध्ये रूजलेली आहे. त्यामुळे लहान वयातच मोबाईल हातात येतो. दुचाकी वाहन चालवण्याची संमती मिळते. पॉकेटमनी म्हणून पैशांचा रतीब सुरू होतो. हा पैसा कसा खर्च होतो याचा हिशोब कधीच घेतला जात नाही.

सध्या मुलांना प्रचंड अभ्यासाचे ओझे असते. चांगले गुण मिळण्याच्या दबावामुळे प्रचंड मानसिक तणाव, त्यातच मर्दानी खेळांचा अभाव अशाने ताण घालवण्यासाठी अंमली पदार्थांकडे ओढली जातात. आपली मुले असल्या भानगडीत पडणार नाही हा अतिआत्मविश्‍वास अनेक पालकांना महागात पडतो. असे नव्हे की वाया गेलेली मुले आणि जाणूनबाजून करणारी मुलेच व्यसनाकडे वळतात. हा समज चुकीचा आहे, कारण आता शाळेत जाणारी १२-१४ वर्षांची मुले अंमली पदार्थाचे सेवन करताना दिसतात. जेव्हा पालकांच्या लक्षात येते तेव्हा ते हतबल होतात. मुले आणि पालक यांच्यामध्ये संवाद हरवला आहे. तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मधला जिव्हाळा कमी झाला आहे. अंमली पदार्थाच्या व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल असल्यामुळे आणि राजकीय हितसंबंधामुळे तो क्लिष्ट बनला आहे.

मुलांना व्यसन मुक्ती केंद्राला भेट देण्यास घेऊन गेले तर त्यांना या व्यसनाची भयानकता अनुभवता येईल. कोणतीही गोष्ट करू नका म्हटल्यावर ते जास्त करण्याकडे मुलांचा ओढा असतो. त्यामुळे अंमली पदार्थ वाईट आहे हे थेट सांगण्यापेक्षा त्याच्या वापरातले धोके लक्षात आणून दिले तर ते फायद्याचे ठरते, तसेच व्यसन करणारी व्यक्ती वाया जाऊन रसातळाला गेली असेही म्हणता येत नाही, कारण तिचे पुनर्वसन होऊ शकते. आपल्या या व्यसनाधीनतेचा इतरांना त्रास होतो याची जाणीव होऊ व्यसनमुक्त होण्याची इच्छा झाली तर व्यसन सोडवता येते. माझी मुले यात नाहीत म्हणून सुटलो असे नाही तर ती कधीही अडकू शकतात याचा विचार करून हा एक सामाजिक प्रश्‍न म्हणून बघावे लागेल. जगात आज दीड कोटी लोक अंमली पदार्थांचे सेवन करतात. भारतातील ३५ लाख लोक या व्यसनाच्या आहारी गेले असून त्यातील २० टक्के अल्पवयीन म्हणजे १८ वर्षाखालील आहे. भारतात दरवर्षी सुमारे अडीच हजार व्यक्ती ज्या या व्यसनात अडकल्या आहेत, त्या आत्महत्या करतात. हे अंमली पदार्थ मेंदूच्या अतिमहत्त्वाच्या प्रणालीवर ताबा मिळवतात. फुफ्फूस, हृदयाचे विकार जडतात. मुले एकलकोंडी बनतात. कधी कधी आक्रस्ताळेपणा करतात. पैसे जास्त खर्च करतात. मुले चोरी करतात, कारण त्यांना व्यसनासाठी पैसे हवे असतात. त्यामुळे या मुलांचा अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी वापर होते. ज्या देशात गरीबी आहे, बेरोजगारी आहे. अशा देशातील तरुण-तरुणींना या व्यवसायात ओढले जाते. आज गुलामगिरी अस्तित्वात नसली तरी एखाद्याचा अशा कामांसाठी वापर करणे ही सुद्धा वेगळ्या तर्‍हेची गुलामीच आहे!