अप्रत्यक्ष वरदहस्त…

0
17
  • देवकी पंडित, ज्येष्ठ गायिका

आशाताईंकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली नाही. पण गानसाधना कशी करावी हे त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे शिकत राहिले. त्यांच्यामधील ऊर्जेला तोड नाही. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना गानसाधनेची मदत झालीच, परंतु आयुष्यातील वादळे शमवताना सुरांनी दिलेली साथ मोलाची ठरली. सुरांची साथ मिळण्यासाठी त्यागभावना शिकणे आवश्यक असते. आशाताईंकडून ही भावना शिकण्याचा माझा कायम प्रयत्न राहील.

संगीताचा आशय श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हा प्रत्येक गायकाचा मूळ हेतू असतो, हे जाणणाऱ्या एखाद्या कलावंताच्या गायकीचा अभ्यास करताना आपल्याला खूप काही शिकायला मिळते. आशा भोसले हे संगीत क्षेत्रामधील मोठे नाव आहे. वयाची जवळपास पंच्याहत्तर वर्षे सांगीतिक कारकीर्द गाजवणाऱ्या आशाताईंकडे प्रत्यक्ष गाणे शिकण्याचा योग कधी आला नाही, पण त्यांच्या संगीतामधून आमच्यासारख्या अनेक कलाकारांवर सांगीतिक संस्कार झाले, हे मात्र खरे! आशाताईंच्या गायकीबद्दल बोलण्याइतकी मी मोठी नाही, पण त्यांच्याकडून काय शिकले हे आज सांगावेसे वाटते.

गाण्यामध्ये चैतन्य असणे म्हणजे काय, हे आशाताईंचे गाणे ऐकून समजते. त्यांची गायकी हरहुन्नरी आणि वैविध्यपूर्ण आहे हे सगळेच सांगतात. पण त्याहीपेक्षा त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये एक प्रकारचे चैतन्य जाणवते. त्यांची गाणी गायचा प्रयत्न करतानासुद्धा चैतन्य संचारते. रियाज, ताल, सूर, आवाज याच्याही पलीकडे एक गाणे असते. ती कलाकाराची खरी ओळख असते. आशाताईंचे गाणे ताल, सूर, रियाजाच्या साच्यात बसणारे नाही. खरे तर आशाताईंच्या गाण्यातील उत्स्फूर्तता हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ‘माझा आवाज किती वर जातो, मी किती हरकती घेऊ शकते’ यावर कौशल्यपूर्ण गायकी सिद्ध होत नाही हे त्यांना खूप लवकर उमगलेले दिसते. कारण आशाताई कधीच नुसत्या गायल्या नाहीत; त्यांनी आपल्या गाण्याचा श्रोत्यांवर काय परिणाम होईल याचा विचार केला. ‘मला किती येते’ याचे प्रदर्शन न करता गाण्यातील भावभावना श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा त्यांचा अट्टहास शिकण्यासारखा आहे. यासाठी गायकीवरील प्रभुत्वापलीकडे जाण्याची शक्ती लागते. सूर हे एक माध्यम आहे हे जाणावे लागते. यासाठी प्रत्येक कलाकारामध्ये प्रगल्भता असावी लागते. आशाताईंच्या गायकीमधून या प्रगल्भतेची सातत्याने प्रचिती येते. सुरांच्या माध्यमाचा उपयोग भावनेसाठी कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. या सूरसाधनेमुळेच कोणत्याही नायिकेवर गाणे चित्रित झाले असले तरी त्याच डोळ्यासमोर येतात. गाणे चित्रित झालेल्या आकर्षक नायिका दिसेनाशा होऊन आशाबाई दिसू लागतात, हीच त्यांच्या आवाजाची खरी ओळख आहे असे वाटते.

आशाताईंसारख्या थोर कलाकारांच्या अभ्यासाविषयी नेहमी बोलले जाते. पण अभ्यासापेक्षाही त्या अंतर्ज्ञानी आहेत, असे मला वाटते. कारण गाणे नुसत्या अभ्यासाने गाता येत नाही. कलेचा अभ्यास करून अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या पद्धती शिकता येतात, पण त्यासाठी लागणारी मूळ कला ही अंगी असावी लागते. अंतरी असणारी कला उत्स्फूर्तता शिकवून जाते. आशाबाईंच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. रियाज करून, गाण्यातील सुरांच्या जागा पाठ करून आशाताई गायल्या असतील, असे मला वाटत नाही. त्यांनी नेहमीच गायकीचे अंतर्ज्ञान वापरले असणार असे मला वाटते. आशाताईंबद्दल ठळकपणे आढळून येणारी आणखी एक बाब म्हणजे प्रचंड ऊर्जा! वयाचे बंधन झुगारून कार्यक्रम करण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. याचे कारण त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा! खरे तर कलाकाराची ऊर्जाच प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. प्रत्येकालाच गाण्यातील सूर, राग यांतील बारकावे समजतात असे नाही; पण गाण्यातील ऊर्जा मात्र प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचते. गाण्यामागची भावना लोकांपर्यंत पोहोचते. आशाताईंची ऊर्जा इतकी अफाट आहे की त्यासमोर वय ही फार दुय्यम बाब ठरते. वयाच्या नव्वदीमध्ये कार्यक्रम करणाऱ्या आशाताई आमच्यासारख्या कलाकारांना नेहमी प्रोत्साहन देतात. आयुष्य पन्नाशीच्या टप्प्यात आले असताना अजूनही बरीच गानसाधना शिल्लक असल्याची ग्वाही आशाताईंची कारकीर्द देते.

आशाताईंच्या आवाजात एक दर्द आहे. दर्द म्हणजे दुःख नाही, पण श्रोत्याला खिळवून ठेवण्यासाठी गायकाच्या आवाजात विशिष्ट दर्द असणे आवश्यक असते. तो दर्द त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जाणवतो. गाणे कितीही हलके-फुलके असले, उडत्या चालीचे असले तरी आवाजातला दर्द त्यातून डोकावत असतो. श्रोत्याला गाण्याकडे खेचून घेण्याची शक्ती त्या दर्दी आवाजामध्ये आहे असे मला नेहमी वाटते. गातानाचे त्यांचे हावभावसुद्धा शिकण्यासारखे आहेत. हावभावामुळे गाणे किती भावपूर्ण होते हे आशाताईंना गाताना पाहिल्यावर जाणवते.
संगीतक्षेत्रामध्ये ‘स्वतःला विसरून गावे’ हे नेहमी ऐकत आले आहे. आशाताई प्रत्येक गाण्यातून स्वतःला विसरून कसे गायचे हेच शिकवतात. गाताना ‘मी’पणा विरघळून गेला पाहिजे. अनेक दिग्गज कलाकारांना प्रयत्नांतीही जमत नाही, ते त्या लीलया करतात. स्वतःला विसरून गाण्याची त्यांची किमया थोर आहे. हे आत्मसात करण्यासाठी गानसाधना महत्त्वाची आहे. गानसाधनेमध्येही काही पायऱ्या आहेत. आधी गाण्यावर प्रेम करता आले पाहिजे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात गाण्यावर मनापासून प्रेम करणारे कलावंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही सापडणार नाहीत. व्यावसायिक भावनेने गाण्याकडे पाहिल्यावर कलावंत म्हणून यशाची शिखरे गाठता येत नाहीत; त्यासाठी कलेशी एकरूप होणे जमावे लागते. कलेची आराधना करणाऱ्या कलावंतांना प्रसिद्धीची हवा लागत नाही. असे कलाकार कधीच आभासी वलयाच्या पलीकडे पोहोचलेले असतात. ते फक्त कलेसाठी जगतात. मोठेपणाचा हव्यास नसणे हेच आशाताईंसारख्या कलाकाराचे मोठेपण आहे असे मला वाटते. संगीतावर केलेले जीवापाड प्रेम हा त्यांच्या यशाचा मूळ स्रोत आहे.

वैयक्तिक आयुष्यात वारंवार आलेल्या वादळांमधून आशाताई सुखरूप बाहेर पडल्या याचे कारण म्हणजे त्यांचे संगीतावरील प्रेम. वैयक्तिक समस्या विसरून कलेत समर्पण करणे त्यांना जमले. त्यामुळे अशा समस्यांमधून कलेने त्यांना तारले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आशाताईंंचे हे गाण्यावरचे प्रेम नवीन पिढीने शिकण्यासारखे आहे असे वाटते. ‘मला गायला आवडते’ ही फार उत्छृंखल भावना आहे असे मला वाटते. ‘गाण्यावर प्रेम करणे’ या संकल्पनेला प्रचंड खोली आहे. त्यामुळे गायला आवडत असले तरी तुम्ही गाण्याला किती न्याय देता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाऊन यश मिळवण्यासाठी नाही तर गाणे आत्मसात करण्यासाठी काय करू शकता हे तुमच्या यशापशाचा आलेख ठरवते. गायकी नसानसांत भिनवण्यासाठी काही त्याग करावे लागतात. ते करायची तयारी आहे का, हा प्रश्न गायकाने स्वतःला सातत्याने विचारायला हवा. त्याग ही गानसाधनेमधील पुढची पायरी आहे. आशाताईंमधील ही त्यागाची भावना शिकण्यासारखी आहे. त्यागामुळे गायकीमध्ये उतरलेली तीव्रता नकळत आपल्याला त्यांच्या त्यागाची जाणीव करून देते. ही गायकीमधील तीव्रता शिकता किंवा शिकवता येत नाही. कितीही पैसे देऊ केले तरी विकत घेता येत नाही. ती प्रेमातूनच येते. यासाठी ‘आपले संगीतावर प्रेम आहे का? आणि त्या प्रेमापोटी आपण त्याग करू शकतो का?’ हे अवलोकन सातत्याने करणे गरजेचे आहे.

संगीतावर प्रेम करण्याची शेवटची पायरी म्हणजे भक्ती! संगीतामध्ये देव शोधणे! कलेला देवत्वाचा दर्जा द्यायचा प्रयत्न करणे हीसुद्धा एक कस पारखणारी बाब आहे.
आम्ही कलाकार संगीतावर प्रेम करत कसेबसे शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, तेव्हा आशाताईंसारखी दिग्गज मंडळी आधीपासूनच तिथे पोहोचून आपल्यावर सांगीतिक संस्कार करत असल्याची प्रचिती येते. संगीतावर निरपेक्ष प्रेम करणे या कलाकारांना जमते, कारण त्यांनी संगीतामध्ये देव पाहिलेला असतो. गानसाधना करणे हा कलाकाराचा शोध असतो आणि आशाताईंसारख्या व्यक्ती या शोधामागची प्रेरणा असतात. गाण्यामध्ये सातत्य अतिशय कठीण आहे. आशाताईंना दैवी देणगी मिळाली आहे असे अनेकजण म्हणतात, पण सातत्याने या देणगीची साधना करून श्रोत्यांच्या मनात घर करण्यासाठी भक्तीची आवश्यकता असते. आशाताईंनी सातत्याने कलेची भक्ती केली. त्यामुळेच आज त्या यशाच्या शिखरावर आहेत असे मला मनापासून वाटते. गाण्यासाठी झिजत राहण्याची प्रेरणा देण्यासाठी आशाताईंसारख्या कलासक्त गायिका लाभल्या हीसुद्धा आमच्यासारख्या कलाकारांसाठी भाग्यदायी बाब आहे! वयाच्या बंधनामध्ये न अडकता सांगीतिक संस्कार करणाऱ्या या चिरतरुण गायिकेला सलाम!