अपात्रता याचिकेवर लवकर निर्णय घ्या

0
4

>> उच्च न्यायालयाची सभापतींना सूचना

>> गिरीश चोडणकर यांची आमदार अपात्रता याचिका निकाली

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गिरीश चोडणकर यांची आमदार अपात्रताप्रकरणी याचिका काल निकालात काढली आहे. सभापतींनी शक्य तितक्या लवकर गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवर निर्णय घ्यावा असे गोवा खंडपीठाने म्हटले आहे. मात्र, खंडपीठाने सभापतींना वेळेचे कोणतेही बंधन घातलेले नाही. सभापतींसमोर 4 अपात्रता याचिका प्रलंबित असल्याने आणि सभापती आमदार अपात्रता याचिकांवर सुनावणी करत असल्याने गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवर निर्णयासाठी सभापतींना ठरावीक मुदत देता येत नाही. मात्र सभापती आमदार अपात्रतेच्या याचिकांवर कालबद्ध पद्धतीने निर्णय घेण्यास बांधील आहेत असे खंडपीठाने म्हटले आहे.

खंडपीठाने सभापतींना कालमर्यादा ठरवून दिलेली नसल्यामुळे तूर्त तरी या 8 आमदारांना दिलासा मिळालेला आहे. तसेच सभापतींवरही ठरावीक मुदतीत ही याचिका निकाली काढण्याचे दडपणही राहिलेले नाही.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह आठ आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर दाखल केली आहे. या अपात्रता याचिकेवर सुनावणी घेतली जात नसल्याने गिरीश चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेऊन अपात्रता याचिका लवकर निकालात काढण्यासाठी सभापतींना निर्देश देण्याची विनंती केली होती.

सभापतींच्या वकिलांचा युक्तिवाद
सभापतींना न्यायालय ठरावीक मुदतीत याचिका निकालात काढण्याचा आदेश देऊ शकत नाही, असा युक्तिवाद सभापती रमेश तवडकर यांच्या वकिलांनी केला होता. सभापतींसमोर आमदार अपात्रता प्रकरणी आणखी याचिका असून क्रमानुसार या याचिकांवर सुनावणी घेतली जात आहे, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली होती.

सभापतींकडे सध्या 4 याचिका
सभापती रमेश तवडकर यांच्याकडे सध्या एकूण तब्बल चार याचिका आहेत. उच्च न्यायालयाने सभापतींना कोणतेही निर्देश न देता याचिका निकाली काढली आहे. सभापती अशाच आणखी 4 याचिकांवर सुनावणी करत आहेत. त्यात अमित पाटकर यांनी दाखल केलेल्यादोन याचिकांचाही समावेश आहे. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर त्वरित निर्णय घेतला जाईल याबद्दल आम्हांला कोणतीही शंका नाही, असे न्यायालयाने याचिका निकालात काढताना नमूद केले आहे. यापूर्वी सभापतींकडे अपात्रता याचिका 90 दिवसांच्या मुदतीत निकाली काढाव्यात असा आदेश तत्कालीन सभापती राजेश पाटणेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. ती याचिकाही चोडणकर यांनीच दाखल केली होती.
या प्रकरणात मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने निवाडा राखून ठेवला होता. काल मंगळवारी संध्याकाळी खंडपीठाने हा निवाडा जाहीर करत चोडणकर यांची याचिका निकालात काढली.