अपहरणानंतर मुलीवर सामूहिक बलात्कार

0
8

>> हॉटेलात डांबून ठेवत पाच दिवस अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वास्को पोलिसांकडून चार संशयितांना अटक; गुन्हा नोंद

वास्कोतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे सुरुवातीला अपहरण करून नंतर चार नराधमांनी तिच्यावर जवळपास पाच-सहा दिवस आळीपाळीने बलात्कार केल्याचे प्रकरण काल उघडकीस आले. मागील आठवड्यात गुरुवारी सदर मुलीचे अपहरण केल्यानंतर नराधमांनी तिला एका हॉटेलमध्ये डांबून ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काल या प्रकरणातील चारही संशयितांना वास्को पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून गजाआड केले.

वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहीतीनुसार, ११ ऑगस्ट रोजी पोलीस स्थानकात एक १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. वास्को पोलिसानी सदर तक्रारीची दखल घेऊन अपहरणाचा गुन्हा नोंद करून प्रथमदर्शनी चौकशी व तपासाला सुरुवात केली. मंगळवारी रात्री उशिरा सदर अल्पवयीन मुलगी कुठे आहे, याचा सुगावा लागताच तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्या मुलीची जबानी घेतली. त्यावेळी चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने पोलीस जबानीत सांगितले. अपहरणानंतर सदर मुलीला वास्कोतील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर पुढील पाच-सहा दिवस तिच्यावर अत्याचार होत होते.

मुलीच्या जबाबानंतर पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिसानी बुधवारी अवघ्या दोन तासांच्या आत बलात्कार प्रकरणातील सर्व संशयितांना ताब्यात घेत अटक केली.

वास्को पोलिसांनी अपहरण व बलात्कार प्रकरणी संशयित मुकूंद रावळ (३५), गुरुव्यंकटेश गुरू स्वामी (३०), कुश जयस्वाल (३०), अफतार हुसैन (२३) यांच्याविरुद्ध अपहरण प्रकरणी भा.दं.सं. ३६३, गोवा बाल कायद्याअंतर्गत ८ खाली गुन्हा नोंद केला. तसेच बलात्कार प्रकरणी सदर चौघांविरुद्ध ३७४ आर/डब्ल्यू, ४(अ) १२ आणि पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. कपिल नायक या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

वर्षभरापूर्वी देखील लैंगिक अत्याचार
संशयितांनी सदर अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या वेळी तिच्यावर बलात्कार केल्याचे चौकशीत उघड झाले. तसेच अटक केलेल्या त्या चौघांपैकी एका संशयिताने सुमारे एका वर्षापूर्वी सदर मुलीच्याच घरी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले.