अधिवेशनात विरोधकांना अधिक वेळ द्या

0
5

>> कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आमदारांची सभापतींकडे मागणी

गोवा विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथे विधानसभा संकुलात काल घेण्यात आली. विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात विरोधी आमदारांना बोलण्यासाठी अधिक वेळ द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी बैठकीत केली.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या बैठकीत विधानसभेच्या कामकाजावर चर्चा करून ते निश्चित करण्यात आले. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जाणार आहे.

विरोधी आमदारांना बोलण्यासाठी कमी वेळ दिला जातो, अशी तक्रार विरोधी आमदारांनी बैठकीत केली; मात्र सभापतींनी त्यांचा हा आरोप फेटाळून लावला. अधिवेशनात सर्वांना समान वेळ दिला जातो, असे सभापती म्हणाले.
विरोधी आमदारांनी बोलण्यासाठी किमान तासभराचा वेळ देण्याची विनंती केली होती. तथापि, अर्धा तास देण्याची तयारी दर्शविली आहे, असे विरेश बोरकर यांनी सांगितले.

अधिवेशनात विरोधी आणि सत्ताधारी आमदारांना प्रश्न विचारण्याची समान संधी दिली जात होती. तथापि, आता प्रश्नोत्तरीसाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने अधिवेशनातील काही दिवस पहिले सहा प्रश्न विचारण्याची संधी केवळ सत्ताधारी गटाला आमदारांना मिळणार आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

माहिती केवळ पाच वर्षांपुरती मर्यादित : आलेमाव

सरकारच्या कारभारात पारदर्शकता राहिलेली नाही. प्रशासन कोलमडले आहे. अधिवेनात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरादाखल दिली जाणारी माहिती केवळ पाच वर्षांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. आणि दुसऱ्या बाजूला सरकारी विधेयकांचा भडिमार केला जातो, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.