अजमेर दर्ग्यात शिव मंदिर असल्याचा दावा

0
3

अजमेर शरीफ दर्गा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या प्रसिद्ध ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याखाली शिवमंदिर होते, असा दावा करणारी याचिका स्थानिक न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाने सदर याचिका सुनावणीसाठी ग्राह्य धरली असून, पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने सर्व पक्षकार, तसेच दर्गा प्रशासन, केंद्रीय अल्पसंख्याक विभाग व पुरातत्व विभागाला नोटीस बजावली आहे. अजमेर न्यायालयात दाखल याचिकेत हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी म्हटले आहे की, या ठिकाणी भगवान महादेवचे मंदिर होते. अजमेर शरीफ दर्ग्याला भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर घोषित करण्यात यावे. तसेच दर्गा समितीचा अनधिकृत अवैध ताबा काढण्यात यावा आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला या ठिकाणी सर्व्हेक्षण करण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत. या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी संबंधित दर्ग्यामध्ये पुरातत्व खात्यामार्फत सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.