अखेर १५४ गोमंतकीय खलाशी गोव्यात

0
287

>> वास्कोतील ४ हॉटेल्समध्ये १४ दिवस विलगीकरणासाठी केली रवानगी

विदेशातील ‘सेव्हन सीज व्होयेजर’ या जहाजात अडकलेल्या ६८ खलाशांना तर मुंबईत ‘कार्णिका’ जहाजात अडकलेल्या ८६ खलाशांना मिळून एकूण १५४ खलाशांना काल मुंबईहून खास बसेसनी वास्कोत आणून वास्कोतील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये १४ दिवसांच्या विलगीकरण्यासाठी ठेवण्यात आले.

गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ युरोपमध्ये ‘सेव्हन सीज व्होयेजर’ या जहाजावर अडकलेल्या ६८ गोमंतकीय खलाशांना गुरुवारी मुंबई बंदरात उतरवल्यानंतर मुंबईहून रस्तामार्गे खास बसेस ने त्यांना काल वास्कोत आणले. वास्कोत काल सकाळी प्रथम तीन बसेसचे आगमन झाले व खास पोलीस बंदोबस्तात वाडे वास्को येथील ग्रॅण्ड फ्लोरा हॉटेलमध्ये १८ खलाशांना उतरविण्यात आले. तर उर्वरित ५० खलाशांना वास्कोतील हॉटेल एचक्यू मध्ये १४ दिवसांच्या विलगीकरणासाठी ठेवण्यात आले. सदर जहाज मुरगाव बंदरात येत होते. परंतु कोरोना महामारीमुळे सदर जहाज युरोपमध्ये अडकून पडले होते. नंतर ते मुंबईत खोल समुद्रात आणून १४ दिवसांच्या विलगीकरणानंतर गुरुवारी या जहाजातील सर्व ६८ खलाशांना मुंबई बंदरात उतरविण्यात आले. नंतर त्यांचे खास बसमधून गोव्यात वास्कोत काल आगमन झाले.

दरम्यान मुंबई ते दुबई या जलमार्गावर वाहतूक करणारे ‘कर्णिका’ हे जहाज मुंबईत दाखल झाले होते. या जहाजावरील सुमारे ८६ गोमंतकीय खलाशांना गुरुवारी दुपारी राज्य सरकारकडून सर्व परवाने देण्यात आल्यानंतर काल त्यांना मुंबईहून खास बसेसमधून गोव्यात वास्कोत आणून त्यांची १४ दिवसांच्या विलगीकरणासाठी येथील हॉटेल ‘सुप्रीम व रेल्वेस्थानकाच्या जवळील ‘फ्लॅगशिप व्हिला दि गोवा’ या हॉटेलमध्ये पोलीस बंदोबस्तात रवानगी करण्यात आली. या जहाजावर सुमारे ८६ गोमंतकीय खलाशी होते. ते गोव्यात येण्यासाठी धडपड करीत होते. मागील दीड महिन्यापासून ‘कर्णिका’ हे जहाज मुंबई येथे खोल समुद्रात होते. या जहाजावरील गोमंतकीय खलाशी वारंवार गोव्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत होते. या सर्व खलाशांच्या आरोग्याची चाचणी घेऊन त्यांना वास्कोत आणून आता १४ दिवसांच्या विलगीकरणासाठी वेगवेगळ्या हॉटेलात ठेवण्यात आले आहे. सहा वेगवेगळ्या गटात हॉटेलमध्ये त्यांना पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले.