अखेर ठरले

0
48

प्रदीर्घ प्रतीक्षेअंती काँग्रेसने आपले उत्तर आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार अखेर शनिवारी जाहीर केले. उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, तर दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अर्थात, काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होईपर्यंत भारतीय जनता पक्षाने उत्तर गोव्यात प्रचाराची दुसरी फेरी, तर दक्षिण गोव्यात पहिली फेरी पूर्ण करून टाकलेली आहे. एक गोष्ट येथे लक्षात घेण्याजोगी आहे ते म्हणजे गोव्यात काँग्रेस पक्ष हा ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवतो आहे. म्हणजेच काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट इ. मिळून ही निवडणूक लढवली जाणार आहे. यातील गोवा फॉरवर्डची भूमिका अजूनही संशयास्पद आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांबाबत निर्णय घेण्यापूर्वीच आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्यातून बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांना उमेदवारी जाहीर करून टाकली होती. काँग्रेसचा तेथे विद्यमान खासदार असताना गोव्यातील त्या जुन्या जाणत्या पक्षाला न जुमानता आम आदमी पक्षाने परस्पर सदर निर्णय घेऊन काँग्रेसला त्याची जागा दाखवून दिली होती. मात्र, केंद्रीय पातळीवर झालेल्या चर्चेत ‘आप’ने माघार घेतली आणि गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढवणार ह्यावर शिक्कामोर्तब झाले. उत्तर गोव्याच्या जागेसाठी रमाकांत खलप यांनी आपली दावेदारी ठोकली होतीच, परंतु त्यांच्या बरोबरच पक्षाचे तरुण नेते विजय भिके हेही ही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. एकेकाळी एनएसयूआयचे नेतृत्व केलेले युवानेते सुनील कवठणकर यांनीही अचानक आपली दावेदारी पुढे केली आणि ह्या तिघांमधून कोण बाजी मारणार, खलपांचा अनुभव कामी येणार की पक्ष नवा चेहरा पुढे करणार ह्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रमाकांत खलप यांची ज्येष्ठता आणि अनुभव त्यांच्या मदतीला आला आहे असे दिसते. शिवाय दोघा तरुण तुर्कांमधील तिकिटासाठीचा संघर्ष खलपांच्या पथ्थ्यावर पडला आहे. आपल्या राजकीय पुनर्वसनाची खलपांची ही अखेरची धडपड राहील असे दिसते. दक्षिण गोव्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यापासून ते माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांपर्यंत अनेकजण इच्छुक होते. एल्विस गोम्स यांनीही आपली दावेदारी रेटण्याचा प्रयत्न चालवला होता. परंतु अखेरीस कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांनी बाजी मारली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॅप्टन विरिएतो यांनी मावीन गुदिन्हो यांच्यासारख्या प्रस्थापित नेत्यापुढे दाबोळी मतदारसंघात मोठे आव्हान उभे केले होते. त्या निवडणुकीत मावीन यांना 7594 मते मिळाली, तर कॅप्टन विरिएतो यांनी 6024 मते मिळवून तुल्यबळ लढत दिली होती. दक्षिण गोव्यामध्ये ख्रिस्ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने काँग्रेस पक्षाने ख्रिस्ती उमेदवार द्यावा असा काहींचा आग्रह होता. कॅप्टन विरिएतो यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. ईस्टरच्या निमित्ताने त्यांनी नेत्यांच्या दारी ठिय्याही दिला होता. विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन गेल्यावेळी भाजप आणि मगो स्वतंत्रपणे लढल्याने विजयी ठरले खरे, परंतु गेल्या पाच वर्षांत त्यांनी लोकसभेत मौनी खासदाराची भूमिकाच वठवली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा आत्मघात करून घेण्याची काँग्रेसची तयारी नव्हती. त्यामुळे त्या तुलनेत कॅप्टन विरिएतो हे नवे नाव पक्षनेतृत्वाच्या पसंतीस उतरलेले दिसते. अर्थात, भारतीय जनता पक्षाने दक्षिण गोव्याची उमेदवारी पल्लवी धेंपो यांना बहाल करून दक्षिण गोव्याच्या निवडणुकीची समीकरणेच पालटवून टाकली आहेत. भाजपच्या पारंपरिक मतपेढीपलीकडील मतपेढीला आकृष्ट करण्यासाठी धेंपो घराण्याची पुण्याई कामी येईल असा विचार भाजपने केला असावा. शिवाय आपल्या नारीशक्तीच्या घोषणेस अनुसरून महिला मतदारांनाही त्याद्वारे पक्षाने साद घातली. दक्षिण गोव्याची जागा जिंकायचीच ह्या जिद्दीने स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांची स्वच्छ प्रतिमा आणि व्यापक जनसंपर्क पक्षाला विजय मिळवून देण्यास पुरेसा आहे असा प्रखर आत्मविश्वास भाजपला दिसतो. प्रचारामध्येही भाजपने जोरदार आघाडी घेतलेली आहे. अशा परिस्थितीत एवढ्या उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने हाताशी उरलेल्या वेळेत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रचारातील हे अंतर आधी भरून काढावे लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘इंडिया’ आघाडीतील इतर घटकपक्ष आणि उमेदवारी न मिळालेले काँग्रेसमधील असंतुष्ट यांना आपल्या प्रचारकार्यात सक्रिय सहभागी करून घेणे हेच ह्या उमेदवारांपुढील सर्वांत पहिले आव्हान राहील असे दिसते आहे.