अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावर तोडगा निघाला

0
15

>> मंत्री राणे यांची माहिती; आजपासून कामावर रुजू

आमरण उपोषण आंदोलन करणार्‍या ७ अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात आला असून, त्या मंगळवारपासून कामावर रुजू होऊ शकतात, अशी माहिती मंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल विधानसभा अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतर सदर सेविकांनी आंदोलन मागे घेतले असून, त्या मंगळवारपासून रुजू होणार आहेत.

गेल्या ४०-४५ दिवसांपासून सदर अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर आंदोलन करत असून, बडतर्फीची कारवाई मागे घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. अधिवेशनानंतर काल अंगणवाडी सेविकांच्या प्रतिनिधींनी मंत्री राणे यांची भेट घेतली. त्यानंतर सदर निर्णय जाहीर केला.

तत्पूर्वी, विधानसभेत विरोधी आमदारांनी मागील दीड महिना आझाद मैदानावर आपल्या अन्यायकारक बडतर्ङ्गीच्या विरोधात आंदोलन करणार्‍या सात अंगणवाडी सेविकांचा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नावर त्वरित तोडगा काढण्याची हमी काल दिली.
दिगंबर कामत यांनी अंगणवाडी सेविकांचा प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर विजय सरदेसाई यांनीही आंदोलन करणार्‍या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नात लक्ष घालण्याचीमागणी केली. सरकारने सामंजस्याची भूमिका घेऊन प्रश्‍न सोडवावा, असे सरदेसाई यांनी सांगितले.