25 C
Panjim
Saturday, August 15, 2020

लोकमान्यांची थोरवी

  • सोमनाथ कोमरपंत

लोकमान्य टिळक आणि अन्य नेत्यांचे चरित्रविषयक लेखन समकालीनांनी भरपूर प्रमाणात केले आहे. निखळ मनाने आणि निःपक्षपाती दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्मांडणी व्हावी. अशी ग्रंथनिर्मिती होत रहावी. त्यामुळे लोकमान्य टिळकांसारख्या हिमालयाच्या शिखरासारखी उत्तुंगता आणि हिंदी महासागराची अथांगता असलेल्या महापुरुषाचे चरित्र नव्या पिढ्यांना स्फूर्तिदायी ठरेल.

भारतासारख्या खंडप्राय देशाचे जवळजवळ चाळीस-पंचेचाळीस वर्षे ज्या धीरोदात्त पुरूषाने नेतृत्व केले, त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू होऊन आज शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या स्मृतिशताब्दीची आज सांगता होत आहे. आजच्या व्यामिश्र जनमानसात हा दिवस किती ममत्वाने आणि उत्कटतेने पाळला जात आहे याविषयी शंकाच आहे. शिवाय आपल्या राष्ट्राला अन् सार्‍या जगाला आज एका अनाकलनीय संकटाने घेरले आहे. पण विस्मरण होऊ न देता त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचे निदान स्मरण करणे एवढेच आपल्या हाती आहे.

लोकमान्यांची थोरवी कशात आहे या प्रश्‍नाचे उत्तर एका वाक्यात द्यायचं असेल तर ती त्यांच्या उज्ज्वल चरित्रात आणि विशुद्ध चारित्र्यात आहे.

आणि विस्तार करायचा असेल तर तो क्षितिजाएवढा करावा लागेल, तेवढी कुवत कुणामध्ये नाही हे मान्यच करावे लागेल. महाकाव्याचा नायक कसा असावा याचे काही संकेत पूर्वसूरींनी ठरवून दिलेले आहेत. हा नायक धीरगंभीर असावा, धीरोदात्त असावा आणि धीरललित असावा. ही त्रिगुणात्मक शक्ती लोकमान्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वात निश्‍चितच होती. लोकमान्यांचे निस्सीम अनुयायी लोकनायक माधव श्रीहरि अणे यांनी संस्कृतमध्ये ‘तिलक यशोर्णव’ हे काव्य लिहिले. त्यातील थोडा अंश आमच्या एस.एस.सी.च्या संस्कृत पाठ्यपुस्तकात होता. तो अभ्यासता आला. लोकमान्य आमच्या पिढीला बालपणापासूनच भेटत गेले. गोष्टीरूपाने, इतिहासाच्या चरित्रप्रसंगातून, पुढे महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या विचारदर्शनातून. शालेय वयात रा. प्र. कानिटकरांनी लिहिलेले चरित्र लिहिले. प्रसंगोपात्त प्रा. गोवर्धनदास पारिख यांनी टिळकचरित्रावर दिलेल्या व्याख्यानांचे पुस्तक वाचले. न. चि. केळकरांचे त्रिखंडात्मक चरित्र वाचले. पुढे प्रा. न. र. फाटक यांनी लिहिलेले ‘लोकमान्य’ हे चरित्र वाचले. धनंजय कीरांनी लिहिलेले टिळकचरित्र वाचले. प्रा. ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकचरित्र वाचले. अनेकांचे स्फुट लेखही. प्रा. श्री. ना. बनहट्टी यांचे ‘टिळक आणि आगरकर’ हे पुस्तक महाविद्यालयीन अभ्यासकालात वाचले. वेगळेच आलोकदर्शन घडले. आणिक अनेकांचा उल्लेख नको. अशा तुकड्यातुकड्यांनी भेटत गेलेल्या टिळकांच्या चरित्रदर्शनातून मनात एक ‘कॅलिडोस्कोप’ तयार झाला. ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ हे विलोभनीय रंगविभ्रमांचे इंद्रधनुष्य आहे अशी प्रतिमा मनात निर्माण झाली. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेच्या आठवणी आपण जणू मिथ्यकथांच्या स्वरूपात ऐकत आलो. ‘‘एकाच माणसाच्या चौसष्ट वर्षांच्या आयुष्यात एवढ्या अमर्याद शक्तींचा साठा?’’ अशी विस्मयाची तार झणाणून गेली आणि ‘‘होय! असेही उत्तर अंतर्मनात येऊन गेले.

तो काळच तसा मंत्रभारलेला होता. त्याने ‘माणसे’ घडविली आणि या ‘माणसां’नी स्फूर्तिदायी इतिहास घडविला. त्यातील एक दिव्य स्फुरण म्हणजे ‘लाल-बाल-पाल’ ही त्रयी. पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल या त्रिमुखांतून एकात्म आत्मस्वर मुखर झाला. त्यामुळे ब्रिटिश साम्राज्यशाहीला हादरे बसले. ‘ब्रिटन रुल्‌स द व्हेव्‌ज्’ या वल्गनेला खिंडार पडले. राष्ट्राच्या एकत्वाची, अभंगत्वाची ती नांदी होती. तिचे उद्गाते होते लोकमान्य टिळक आणि प्रभृती. लोकमान्यांचे असामान्यत्व आहे ते या धीरोदात्ततेत. कालपुरुषाची स्पंदने त्यांनी कान लावून एकतानतेने, द्रष्टेपणाने आणि मनस्वी वृत्तीने पहिल्यांदा ऐकली. त्यांच्यामागे सारा देश उभा राहिला. ‘‘स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळविणारच’’ या शब्दांना मंत्रशक्ती प्राप्त झाली. स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय हे लोकमान्यांच्या जीवनग्रंथाचे प्राणतत्त्व बनले. लोकमान्य हे विशेषनाम झाले.

लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्राचा समग्रतेने आणि साक्षेपी वृत्तीने धांडोळा घेतला तर संघर्ष हा त्यांच्या जीवितकार्याचा प्राण आहे असे दिसून येईल. अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार करणे हा त्यांचा जीवितहेतू होता. भारतीय जनतेच्या शबलतेमुळे ही संस्कृतिसमृद्ध भूमी कोसोमैल दूर असलेल्या ब्रिटिश सत्तेच्या अधीन झाली. हा दुर्दैवदुर्विलासाचा एक फेरा होता. पण लोकमान्य हातपाय गाळून बसणार्‍यांपैकी नव्हते. त्यांची इच्छा असती तर त्यांच्यासारखा असामान्य बुद्धिमत्ता असलेला माणूस शासकीय सेवेत उच्च पदावर किंवा आवडीच्या अन् स्वस्थ स्वरूपाच्या अध्यापनक्षेत्रात सुखेनैव कालक्रमणा करीत राहिला असता. पण त्यांचा आत्मा अस्वस्थ होता. त्यांच्या हातून जे कार्य घडले त्यामागे त्यांची जबरदस्त अंतःप्रेरणा होती. नेतृत्वाचे गुण उपजत होतेच. ते त्यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या सहकार्‍यांसमवेत शैक्षणिक कार्यात प्रकट केले होते. राष्ट्रीय जागृती करणे, जनसामान्यांमधील स्वातंत्र्याकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान तळागाळापर्यंत पोचविणे हा हेतू मनाशी बाळगून त्यांनी आपल्या युयुत्सू नेतृत्वाला विधायक कार्याची जोड दिली. त्यामुळे त्यांचे नेतृत्व जनसामान्यांनी लीलया स्वीकारले. या समर्पणशील वृत्तीच्या नेत्याने महाराष्ट्रात आणि देशाच्या अन्य भागांत सर्वसंचार केला. आपल्या प्रकृतीची त्यांनी हेळसांड केली. पंधरा वर्षे त्यांना मधुमेहाचा विकार जडलेला होता.

लोकमान्यांना २४ जून १९०८ रोजी अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मंडालेच्या तुरूंगात रवाना करण्यात आले. १५ जून १९१४पर्यंत ते तिथे विजनवासात होते. दरम्यानच्या काळात त्यांची पत्नी सौ. सत्यभामाबाई यांचे मधुमेहाच्या विकारानेच ७ जून १९१२ रोजी निधन झाले. तीन-चार वर्षे त्यांची तब्येत बिघडलेलीच होती. लोकमान्यांना हद्दपार केल्यापासून सत्यभामाबाईंनी अन्नत्याग केला होता. दूध आणि फलाहार यापलीकडे त्या काही घेत नसत. चार वर्षांत त्या आपल्या राहत्या घराबाहेर पडल्या नाहीत. व्रतवैकल्ये त्या कडक रीतीने पाळत होत्या. लोकमान्य राज्यारोहणप्रसंगी सुटतील व त्यांची आपली एकवेळ भेट होईल अशी आशा त्यांना वाटत होती. पण ती फोल ठरली. लोकमान्यांप्रमाणेच सत्यभामाबाई सात्त्विक, सरळ स्वभावाच्या पण तितक्याच करारी होत्या.

लोकमान्यांचा जीवनप्रवास हा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. राष्ट्रकारणासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या या तेजस्वी पुरुषाचे चरित्र सर्वांनाच ज्ञात आहे. स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठा ही तर लोकमान्यांची जीवनधारणा होती. खळाळते चैतन्य हा त्यांचा स्थायी भाव होता. आजीवन त्यांनी कष्ट आणि कष्टच सोसले. कधी विसावा घेतला नाही. त्यांच्या जीवनातील काही टप्प्यांचे अधोरेखन करावे लागेल. अनेक प्रकारच्या अग्निदिव्यांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व तावून सुलाखून निघाले. सार्वजनिक सभा ज्यावेळी नेमस्तांच्या ताब्यात होती, ती क्रियाशील बनविण्यासाठी त्यांनी आपल्या ताब्यात घेतली.

स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी अर्जविनंत्यांचे राजकारण करणे हे शबलत्वाचे लक्षण आहे असे मानून ‘केसरी’ आणि ‘मराठा’मधील तेजस्वी अग्रलेखांमधून आणि अनेक प्रसंगी प्रखर वाणीत भाषणे देऊन त्यांनी निकराचे प्रयत्न केले. जनमानसातील मरगळ काढून टाकली. दुष्काळनिवारणाचे त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. १८९६च्या दुष्काळप्रसंगी शेतकर्‍यांना त्यांनी सांगितले की पीक कमी असेल तर सारामाफी हा तुमचा हक्क आहे. तो मागून घ्या. दुष्काळाच्या लगोलग प्लेगची साथ पसरली. त्याच्या प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँडच्या हाताखालील गोर्‍या अधिकार्‍यांनी धुमाकूळ घातला. त्याविषयी लोकमान्यांनी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त केली. आपद्ग्रस्तांसाठी धान्याची दुकाने खुली केली. त्यांच्यासाठी निधी जमा केला. सार्वजनिक रुग्णालये उभी केली. २२ जून १८९७ रोजी चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला. या काळात ‘‘राज्य करणें म्हणजे सूड उगविणे नव्हे’’. आणि ‘‘सरकारचे डोकें ठिकाणावर आहे काय?’’ हे प्रखर स्वरूपाचे अग्रलेख हिहिले. १८९९ नंतरच्या कालखंडात तर स्वातंत्र्य-संग्रामाला खर्‍या अर्थाने तेज प्राप्त झाले. या पर्वात लोकमान्यांचा वाटा सिंहाचा आहे. हे नमूद करायला हवे. ४ जुलै १८९९ रोजी ‘पुनश्‍च हरिः ॐ’ हा अग्रलेख लिहिला. इंग्लंडचा नैतिक आणि बौद्धिक अधःपात होत आहे हे त्यांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने दाखवून दिले. लॉर्ड कर्झनची राजनीती आणि त्याने केलेली बंगालची फाळणी हे लोकमान्य टिळकांनी आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले. फाळणीविरोधी मोहिमेत ते अग्रभागी ठामपणाने राहिले. सुरत कॉंग्रेसच्या अधिवेशनात लोकमान्यांनी अध्यक्षांच्या निवडीला विरोध करताच टिळकांवर टीकाप्रहार झाला. पण टिळक निश्‍चलपणे उभे राहिले.

‘‘आपली मातृभूमी आपणा सर्वांस या उद्योगास लागण्याबद्दल आवाहन करीत आहे. मातृभूमीच्या या आव्हानाकडे लक्ष देऊन कोणताही भेदभाव मनात न ठेवता आपण सर्व राष्ट्रदेव होऊ या.’’ हे लोकमान्यांनी अविचल जीवननिष्ठेने आणि धीरोदात्त वृत्तीने तोंड दिले. या पुरुषसिंहाने ब्रिटिश सत्तेला नामोहरम केले. क्रांतिकारकांच्या कार्याला त्यांनी नेहमीच नैतिक पाठिंबा दिला.

आधुनिक जगतात भगवद्गीतेतील कर्मयोग विशद करणारा कृतिशील विद्वान म्हणून ‘गीतारहस्या’च्या रूपाने लोकमान्यांची तेजस्वी प्रतिमा निर्माण झालेली आहे. प्राच्यविद्या, गणित शास्त्र, ज्योतिषशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, दैवतशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवरील त्यांचे प्रभुत्व, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवरील त्यांचे प्रभुत्व पाहता त्या काळात असे आंतरविद्याशाखीय नैपुण्य असलेले व्यक्तिमत्त्व निर्माण व्हावे हा बौद्धिक चमत्कार वाटतो. वास्तविक पाहता त्याचा परामर्श स्वतंत्रपणे घ्यायला हवा. गणित आणि संस्कृत या विषयांचे अध्यापन ते फर्ग्युसन महाविद्यालयात करीत असत. या क्षेत्रातील त्यांचा अधिकार मोठा होता.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाविषयीचे तसेच लोकमान्य टिळक आणि अन्य नेत्यांचे चरित्रविषयक लेखन समकालीनांनी भरपूर प्रमाणात केले आहे. आजच्या लोकशाहीच्या जमान्यात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे आणि अभिनिवेशाचे स्वरूप आल्यामुळे वस्तुनिष्ठ इतिहास झाकोळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. निखळ मनाने आणि निःपक्षपाती दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्मांडणी व्हावी. अशी ग्रंथनिर्मिती होत रहावी. त्यामुळे लोकमान्य टिळकांसारख्या हिमालयाच्या शिखरासारखी उत्तुंगता आणि हिंदी महासागराची अथांगता असलेल्या महापुरुषाचे चरित्र नव्या पिढ्यांना स्फूर्तिदायी ठरेल आणि राष्ट्रजीवनातील ‘कश्मल’ निघून जाईल.
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

भिन्न विचारसरणी ः यशाचे गमक

-   प्रा. प्रदीप मसुरकर (मुख्याध्यापक, जीएसएच नामोशी-गिरी) सध्या कोरोनामुळे मुलं आपल्या घरी असतील. त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांच्या विचारांना चालना द्या, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळा व...

चातुर्मास ः एक आनंददायी पर्व

 नारायणबुवा बर्वे (वाळपई) कोरोना महामारी घालवण्यासाठी भारतासह जगामध्ये हेच भारतीयत्व वापरणे सुरू आहे. शरीर, मन, परिसर स्वच्छ राखणे आणि चातुर्मास पाळणे हेच आहे सोवळे-ओवळे म्हणजेच...

शिक्षण ः अखंड तेवणारा नंदादीप

 सौ. नीता महाजन शाळेतला फळा, खडू, पुस्तक हेच केवळ शिकवण्याचे साधन नाही तर आजच्या या परिस्थितीत मोबाईल, टीव्ही, रेडिओ ही माध्यमे खूप चांगल्या पद्धतीने...

उंच माझा झोका

अक्षता छत्रे कलाकारांचे परिश्रम, त्यांची वेशभूषा, रंगभूषा अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा अधिक सखोलपणे केला गेलेला अभ्यास, तसेच विक्रम गायकवाड व स्पृहा जोशी यांच्या परिश्रमातून सुरेख...

पत्रकार टिळक ः एक कटाक्ष

 प्रा. रमेश सप्रे ‘१ ऑगस्ट’ नियमितपणे येतो नि जागवल्या जातात पत्रकार, लोकनेते, संशोधक असलेल्या लो. टिळकांच्या आठवणी ज्यात प्रामुख्यानं लहानपणच्या शेंगांच्या टरफलांची गोष्ट, नंतरची...