भूतानी इन्फ्राच्या सांकवाळ येथील होऊ घातलेल्या वादग्रस्त महाकाय प्रकल्पाच्या विरोधात गोवा बचाव अभियान व पीटर डिसोझा आणि इतर लोक अशा दोन जनहित याचिका काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावल्या. यासंबंधीचा निवाडा काल न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आभासी पद्धतीने दिला.
गोवा बचाव अभियान, तसेच पीटर डिसोझा व इतरांनी आपल्या जनहित याचिकेतून भूतानी इन्फ्राचा हा प्रकल्प बेकायदेशीर असून, तो उंच अशा टेकडीवर असल्याचे आणि त्या प्रकल्पाला पर्यावरणीय दाखला मिळाला नसल्याचे आपल्या याचिकेतून स्पष्ट केले होते. तसेच या प्रकल्पाचे बांधकाम करण्यासाठी कित्येक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकल्पामुळे सांकवाळ गावातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्याचेही याचिकेत नमूद केले होते. मात्र न्यायालयाने वरील दोन्ही जनहित याचिका काल फेटाळून लावल्या.
सुमारे दोन वर्षांपूर्वी जेव्हा या प्रकल्पाचे काम सांकवाळ गावात सुरू झाले होते, तेव्हा स्थानिकांनी आणि एनजीओंनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. प्रकल्पाविरोधातील तीव्र आंदोलनाची दखल नगर-नियोजन खात्यालाही घ्यावी लागली होती.