वाठादेव-डिचोलीतील धक्कादायक घटना; डिचोली पोलिसांकडून संशयित पतीला अटक
वाठादेव-डिचोली येथील रोलिंग मिलजवळ भररस्त्यात 32 वर्षीय पतीने 24 वर्षीय पत्नीचा तलवारीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना काल घडली. या दोघांतील संबंध बिघडल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच पतीने पत्नीवर तलवारीने वार करून तिची जीवनयात्राच संपवली. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी वाठादेव येथील मैनुद्दीन हवांगी याला अटक केली आहे.
सविस्तर माहितीनुसार, खुनाची ही घटना काल दुपारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वाठादेव येथील रोलिंगमिलच्या रस्त्यावर घडली. राबिया हवांगी ही आपल्या 4 वर्षीय मुलीला शिकवणीला सोडण्यास गेली होती. मुलीला सोडून ती वाठादेव येथे घरी परतत असताना मैनुद्दीन हवांगी याने आपल्या कारने भरधाव वेगाने येत थेट राबिया हिच्या दुचाकीला सर्वप्रथम ठोकरले. त्याबरोबर ती रस्त्यावर कोसळली. यानंतर मैनुद्दीन हा हातात तलवार घेऊनच कारमधून उतरला व त्याने राबियावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याने राबियाच्या हात, मान आणि पोटावर वार केले. यानंतर तलवार तिथेच टाकून तो पेोलिसांना शरण आला.
या दरम्यान रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी या घटनेची माहिती राबिया हिच्या कुटुंबीयांना दिली. तिचे चुलते आणि इतरांनी रक्तबंबाळ अवस्थेत तिला डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण घटनेचा पंचनामा केला. तसेच या खुनासाठी वापरलेली तलवार जप्त केली.
मैनुद्दीन हवांगी याला अमलीपदार्थांचे व्यसन लागले होते. अमलीपदार्थांच्या विळख्यात सापडल्याने तो पत्नी व चार वर्षीय मुलीकडे लक्ष न देता सदैव भांडणे उरकून काढून पत्नीला मारहाण करत होता. त्यामुळे राबिया हिने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.