Home Featured ‘पोगो’वरून विधानसभेत गदारोळ

‘पोगो’वरून विधानसभेत गदारोळ

0

विधानसभेत काल खासगी कामकाजाच्या वेळी आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांचा गोमंतकीयांची व्याख्या निश्चित करणारा ‘पोगो’ ठराव बराच गाजला. खासगी कामकाजाच्या वेळी वीरेश बोरकर यांचा गोमंतकीय आणि गोव्याचे मूळ लोक (पोगो) या विषयावरील खासगी ठराव फेटाळल्याने सभागृहात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व आमदार वीरेश बोरकर यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्याने काल गदारोळ झाला. विरोधी गटातील सात आमदारांनी सभापतींसमोरील हौदात धाव घेऊन ठराव मांडू न देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत घोषणाबाजी केली. अखेर, सभापतीच्या सूचनेनंतर मार्शलांनी वीरेश बोरकर यांना सभागृहातून बाहेर काढले.

वीरेश बोरकर यांनी खासगी कामकाजाच्या वेळी गोव्याची वेगळी ओळख जपणे, लोकसंख्याशास्त्रीय बदल रोखणे आणि स्थानिकांना राज्य योजनांचा लाभ मिळावा म्हणून सरकारने गोमंतकीय आणि गोव्याचे मूळ लोक याची कायदेशीर व्याख्या करण्याची मागणी करणारा खासगी ठराव सभागृहात मांडण्यास सुरूवात केली.
हा ठराव मांडण्यास मुख्यमंत्र्यांनी हरकत घेतली. गोवा सरकारच्या 10 फेब्रुवारी 1995 च्या अधिकृत राजपत्रात गोवेकरांची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी ठराव अनावश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.

बोरकर यांना खासगी ठराव मांडण्यास मान्यता दिली जात नसल्याने विरोधी सहा आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर विरोधी आमदारांनी सभापतींसमोरील हौदात जाऊन खासगी ठराव मांडण्यास मान्यता देण्याची मागणी केली. त्यानंतर सभापतींनी त्यांना खासगी ठराव मांडण्यास मान्यता दिली. सदर ठराव मांडण्यास सत्ताधारी गटातील आमदारांनी विरोध केल्यानंतर विरोधी आमदारांनी पुन्हा एकदा सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. यावेळी वीरेश बोरकर आणि युरी आलेमाव यांनी हातातील कागदपत्रे सभापतींच्या दिशेने भिरकावली. अखेर, सभापतींच्या सूचनेनुसार मार्शलांनी बोरकर यांना सभागृहातून बाहेर काढले.