बारावीचा निकाल मंगळवारी

0
125

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या ३० एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार आहे. बारावीच्या गुणपत्रिकांचे वितरण निकालाच्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० यावेळेत केले जाणार आहे. बार्देश, तिसवाडी, पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांत उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण पर्वरी येथे मंडळाच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. काणकोण, केपे, सांगे, सासष्टी आणि मुरगाव तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण मडगाव येथील लॉयोला उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील सुमारे १७ हजार ८९३ मुलांनी बारावीची परीक्षा दिली आहे. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनांनी शालान्त मंडळाच्या पर्वरी येथील कार्यालयातून विद्यार्थी किंवा पालकांना थेट गुणपत्रिका नेण्यास मज्जाव करावा. केवळ, खासगी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या कार्यालयातून परीक्षेचे ओळखपत्र सादर करून गुणपत्रिका न्याव्यात, असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.