‘कॉंग्रेसची उमेदवारी मला मिळणार हे निश्‍चित होते’

0
111

>> बाबुश मोन्सेरात : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया

पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी हवी म्हणूनच आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आपणाला उमेदवारी मिळणार हे निश्‍चित होते असे बाबुश मोन्सेर्रात यांनी काल त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगितले.

या पोटनिवडणुकीत तुमचा विजय होईल याची खात्री आहे काय, असे विचारले असता मला निवडून आणायचे की नाही याचा निर्णय पणजी मतदारसंघातील जनताच घेणार आहे. त्यामुळे त्याबाबत आपण चिंता करीत नसल्याचे मोन्सेर्रात यांनी स्पष्ट केले.
भाजप मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे, असे विचारले असता ते म्हणाले की ह्या निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरणार आहे त्याचा मी विचार करीत नाही. प्रत्येक उमेदवार मग तो अपक्ष का असेना तो जिंकण्यासाठी निवडणूक लढवीत असतो. आपणही जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले. पणजी मतदारसंघात आता बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पणजी पोटनिवडणूक : मगोची
भूमिका लवकरच : ढवळीकर

पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची आपली भूमिका मगो पक्षाने अद्याप ठरवलेली नाही. मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीतच त्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे काल मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
मगो पक्ष पणजी मतदारसंघातील निवडणुकीतही कॉंग्रेसला आपला पाठिंबा जाहीर करणार आहे काय, असे विचारले असता ढवळीकर यानी वरील प्रतिक्रिया दिली. पणजी मतदारसंघातून बाबुश मोन्सेर्रात यांना उमेदवारी देण्याचा कॉंग्रेस पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्याबाबत आपणाला काहीही म्हणायचे नाही, असे गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी काल सांगितले. पणजीतील पोटनिवडणुकीत गोवा फॉरवर्डचा उमेदवार नसेल असे ते म्हणाले.