माजी केंद्रीय मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हे शनिवार दि. 26 जुलै रोजी गोव्याच्या राज्यपालपदाचा कार्यभार सांभाळतील. राजभवनावर शनिवारी सकाळी 11.30 वाजता त्यांचा शपथविधी होईल. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे हे त्यांना राज्यपालपदाची शपथ देतील.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागी पुसापती अशोक गजपती राजू यांच्या नियुक्तीचा आदेश राष्ट्रपतींनी 14 जुलै रोजी जारी केला होता.
या पार्श्वभूमीवर, पुसापती अशोक गजपती राजू यांचे काल सायंकाळी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथे राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो आणि पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्यांचे स्वागत केले.