Home Featured पूजा नाईकला निखिल देसाईंची कायदेशीर नोटीस

पूजा नाईकला निखिल देसाईंची कायदेशीर नोटीस

0

सरकारी नोकरी घोटाळ्यात नाव घेतल्याने माफी मागण्याची मागणी

… अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा

कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी असलेल्या पूजा नाईक यांना आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा प्रकरणी आपणावर लाच घेतल्याचे जे आरोप केले आहेत त्या प्रकरणी माफी न मागितल्यास तिच्यावर 17 कोटी रु. चा अब्रुनुकसानीचा दावा घालण्यात येणार असल्याचे या कायदेशीर नोटिशीतून स्पष्ट केले आहे.

वकील जोनाथन बी. जॉर्ज यांच्याद्वारे पाठवण्यात आलेल्या या कायदेशीर नोटिशीत निखिल देसाई यांनी, पूजा नाईक हिने कोणत्याही पुराव्यांशिवाय आपणावर लाचखोरीचे आरोप केलेले असून त्याद्वारे आपले चारित्र्यहनन करून आपणाला बदनाम केलेले आहे. पूजा नाईक हिने केलेल्या खोट्या आरोपांमुळे आपली मानहानी झालेली असून चारित्र्याला डाग लागला आहे. आपली विश्वासार्हता तसेच नैतिकता याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. ही कायदेशीर नोटीस मिळाल्याच्या 72 तासांच्या आत पूजा नाईक हिने बिनशर्त आपली लेखी माफी मागावी व ती वृत्तपत्रे, माध्यमे व समाजमाध्यमांवरून लेखी तसेच व्हिडिओच्या स्वरूपात प्रसिद्ध करावी. तसेच यापुढे आपली आणखी बदनामी करणार नसल्याचे लेखी आश्वासनही द्यावे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. तसेच नोटीस मिळाल्यानंतर 72 तासांच्या आत जर आपली माफी मागितली नाही तर भारतीय न्याय संहितेच्या 2023, कलम 356 खाली तसेच अन्य नियमांखाली कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय तुम्ही लाच देण्यासाठी 17 कोटी रु. लोकांकडून घेतले होते असे जे म्हटले आहे तेवढ्याच रकमेचा अब्रुनुकसानीचा दावा तुमच्यावर घालण्यात येणार असल्याचे देसाई यांनी या नोटिशीत म्हटले
आहे.

‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यातील एक आरोपी असलेल्या पूजा नाईक हिने काही दिवसांपूर्वी या घोटाळ्याबाबत अचानकपणे पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचे आरोप करताना हा घोटाळा तब्बल 17 कोटी रु. चा असल्याचा दावा केला होता. तसेच त्यात एक मंत्री, एक आयएएस अधिकारी व एका सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप केला होता. आयएएस अधिकाऱ्याचे नाव उघड करताना तिने तो निखिल देसाई असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी पूजा नाईक हिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

पुराव्यांसह पोलिसांत तक्रारी करा

फसवणूक झालेल्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

नोकरी घोटाळ्यात पूजा नाईककडून फसवणूक झालेल्या काही लोकांनी काल रविवारी साखळी येथील रवींद्र भवनमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. फसवणूक झालेल्या लोकांची व्यथा ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पूजा नाईक हिच्याविरुद्ध तुमच्याकडे असलेले सर्व पुरावे घेऊन संबंधित पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा असा सल्ला दिला.
सध्या या नोकरी घोटाळाप्रकरणाची चौकशी क्राइम ब्रँच करत असून लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, असे आश्वासनही डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फसवणूक झालेल्यांनी, आम्ही कष्टाने कमावलेले पैसे मोठ्या आशेने पूजा नाईक हिला दिले होते. परंतु तिने आमचा विश्वासघात केला. आजतागायत आम्हाला एकही रुपया परत मिळालेला नाही. शेवटी दुसरा पर्याय नसल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती दिली.