Home Featured दिल्ली स्फोटातील कारच्या मालकास अटक

दिल्ली स्फोटातील कारच्या मालकास अटक

0

टीआरएफने स्वीकारली स्फोटाची जबाबदारी

दिल्ली स्फोटप्रकरणी एनआयएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आय-20 कार विकत घेणाऱ्या आमिर राशिद अली याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. आमिर अलीने हल्लेखोरासोबत कट आखला होता. आमिर राशिद अली हा जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी आहे.
प्लंबर म्हणून तो काम करत होता. आमिरने डॉ. उमरसोबत मिळून दिल्लीत दहशत माजवण्याचा धोकादायक कट रचला होता. आमिर हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील सांबुरा येथील रहिवासी आहे. आत्मघातकी हल्लेखोराने कारमध्ये स्फोट घडवण्यासाठी आयईडीचा वापर केला. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील सुभाष मार्ग सिग्नलवर झालेल्या स्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला होता. 20 हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

स्फोटातील कार अमीरच्या नावे
स्फोटात वापरलेली कार अमीरच्या नावावर नोंदणीकृत होती. फॉरेन्सिक चाचण्यांमध्ये मृत चालकाची ओळख डॉ. उमर उन नबी अशी झाली आहे, जो फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठातील जनरल मेडिसिन विभागातील साहाय्यक प्राध्यापक आणि पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे. एनआयएने नबीचे आणखी एक वाहनदेखील जप्त केले आहे, ज्याची आता पुराव्यासाठी तपासणी केली जात आहे.

लखनौमधून दोघे ताब्यात
दिल्ली स्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने काल रविवारी लखनौ येथून भाऊ आणि बहिणीला ताब्यात घेतले. सदर दोन्ही आरोपी हे पारा परिसरातील कुंदन विहारमध्ये राहणारे असून त्यांचे या स्फोटांशी संबंध असल्याचा संशय आहे.

दिल्लीत 34 बेवारस वाहने जप्त
दिल्ली स्फोटानंतर मध्य दिल्लीत दहशतवादविरोधी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी 34 बेवारस वाहने जप्त केली आणि 417 वाहनांचे चलनही काढण्यात आले. पोलिसांनी बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी सशस्त्र कर्मचारी तैनात केले आहेत.
हॉटेल्स, गेस्ट हाऊस, सायबर कॅफे, केमिकल दुकाने आणि सिम कार्ड विक्रेत्यांवर सखोल तपासणी सुरू आहे.

जबाबदारी टीआरएफने स्वीकारली
दिल्लीतील स्फोटाची जबाबदारी द रेझिस्टंट फोर्स (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने अधिकृतपणे स्वीकारली आहे. टीआरएफ ही लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची एक शाखा आहे.