Home Featured गिरीतील अपघातात सरकारी अधिकारी ठार

गिरीतील अपघातात सरकारी अधिकारी ठार

0

दुचाकी घसरल्याने बसच्या चाकाखाली सापडून गमावला जीव

राष्ट्रीय महामार्गावर म्हापसा-गिरी येथे काल सकाळी खासगी प्रवासी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कायदा विभागाचे अवर सचिव नारायण अभ्यंकर (51, रा. कोलवाळ) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बसचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्यांना जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण अभ्यंकर हे काल सकाळी साडेअकराच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन पर्वरीच्या दिशेने जात होते. गिरी म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर अचानक दुचाकी घसरल्याने ते बसच्या मागच्या चाकाखाली सापडले. बसचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच गतप्राण झाले. या अपघातामुळे या ठिकाणी बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी इस्पितळात पाठवण्यात आला. तसेच बस जप्त केली आणि चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेनंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत चिखलामुळे निसरडा बनलेला रस्ता पाण्याची फवारणी करून साफ केला.

अपघाताबाबत वेगवेगळे दावे

काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य एका दुचाकीने धडक दिल्याने नारायण अभ्यंकर यांचा तोल गेल्याने ते दुचाकीसह खाली कोसळले आणि बसच्या चाकाखाली सापडले. तर काहींच्या मते नारायण अभ्यंकर यांच्या दुचाकीला बसची धडक बसल्याने ते खाली पडले, तर काहींनी या ठिकाणच्या चिखलामुळे निसरड्या बनलेल्या रस्त्यामुळे ते घसरून खाली पडल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले.