Home Featured पिता-पुत्राकडून सहकारी कामगाराचा खून

पिता-पुत्राकडून सहकारी कामगाराचा खून

0

पर्रा बार्देश येथील घटना; म्हापसा पोलिसांकडून सात तासांत संशयित गजाआड

बार्देश येथील फोंडकेवाडो-पर्रा येथे एका इमारत बांधकामाच्या ठिकाणी ओडिशातील एका कामगाराचा त्याच्या दोन सहकाऱ्यांनी खून केल्याची घटना घडली. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास पिता-पुत्राने मिळून निर्घृणपणे सदर कामगाराखा खून केली. यानंतर अवघ्या सात तासांत अथक परिश्रमानंतर म्हापसा पोलिसांनी दोघांही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. सत्या नबरंगपुरा (50) व थाबिर नबरंगपुरा (31, दोघेही रा. ओडिशा) अशी या अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, मृत कामगार हा संशयितांचा नातेवाईक आहे; मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, फोंडकेवाडो-पर्रा येथे एका व्हिलाचे बांधकाम सुरू आहे. या व्हिलाच्या ठिकाणी हे तिघेही गवंडी म्हणून कामाला होते. या व्हिलाच्या शेजारीच बांधलेल्या पत्र्याच्या झोपडीत ते वास्तव्याला होते. तिथेच हा खूनाचा प्रकार घडला. तिघेही या झोपडीत एकत्रित राहायचे. सदर खून नेमका कुठल्या वादातून झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

संशयित पिता-पुत्राने धारदार शस्त्राने मयताचे डोके ठेचले, तसेच पोट व गुप्तांग कापले. खून केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरुन पसार झाले व जवळील शेतातच रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत तिथेच लपून बसले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून पहाटेच्या वेळी दोघाही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांचा शोध घेण्यासाठी म्हापसा पोलिसांनी बरेच परिश्रम घ्यावे लागले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.
पोलीस निरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक अजय धुरी, यशवंत मांद्रेकर, बाबलो परब, विराज कोरगावकर, सहाय्यक उपनिरीक्षक महेश शेटगावकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत नाईक चोपडेकर व इतर पोलिसांनी या खूनाच्या तपास व शोधकार्यात महत्वाची भूमिका निभावली.