भाजपचा पणजीचा उमेदवार दोन दिवसात निश्‍चित : तेंडुलकर

0
117

भाजपचा पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी उमेदवार येत्या दोन दिवसात निश्‍चित केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

भाजपच्या उमेदवारीसाठी उत्पल पर्रीकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपकडून सोपविण्यात येणारी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी उत्पल पर्रीकर दर्शविलेली आहे.

स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून गुरूवारी उमेदवाराच्या संभाव्य नावाबाबतचा अहवाल भाजपच्या केंद्रीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे. दिल्लीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले.

भाजपने पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी महानगरपालिकेतील नगरसेवकांशी बुधवारी चर्चा केली. तसेच स्थानिक भाजप मंडळ समितीच्या बैठकीत संभाव्य उमेदवाराच्या नावाबाबत विचार जाणून घेण्यात आला आहे. या बैठकीत तेंडुलकर यांनी सहभाग घेतला.

तेंडुलकर आणि महासचिव सतीश धोंड, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक वैदेही नाईक, शुभम चोडणकर, शेखर डेगवेकर, मिनिनो डि क्रुज, दीक्षा माईणकर, शीतल नाईक, प्रमय माईणकर, किशोर शास्त्री, पुंडलिक राऊत देसाई, विशांत आगशीकर यांच्याशी वैयक्तिक पातळीवर थेट संवाद साधून उमेदवाराबाबत मत जाणून घेतले आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्‍वासन नगरसेवकांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजपपासून फारकत घेतलेले रायबंदर येथील नगरसेवक रूपेश हर्ळणकर यांचे भाजप उमेदवारांबाबत मत जाणून घेण्यात आले आहे.